उंबर्डे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनंदा संजय पवार तर उपसरपंचपदी संभाजी शिवाजी पवार यांची बहुमताने निवड झाली. सरपंच, उपसरपंच निवडीवेळी नाट्यमयरीत्या घडामोडी घडल्या. बहुमतातील आघाडीची दोन मते फुटल्याने अल्प मतातील आघाडी बहुमतात आली.
वडूज : उंबर्डे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनंदा संजय पवार तर उपसरपंचपदी संभाजी शिवाजी पवार यांची बहुमताने निवड झाली. सरपंच, उपसरपंच निवडीवेळी नाट्यमयरीत्या घडामोडी घडल्या. बहुमतातील आघाडीची दोन मते फुटल्याने अल्प मतातील आघाडी बहुमतात आली.
नूतन सरपंच सुनंदा या माजी सरपंच, सोसायटीचे माजी चेअरमन व सुप्रसिद्ध कन्स्ट्रक्शन व्यावसायिक संजय यशवंत पवार यांच्या पत्नी तर उपसरपंच संभाजीराजे हे माजी उपसरपंच व ज्येष्ठ नेते शिवाजीराव बाबूराव पवार यांचे सुपुत्र आहेत. हे मूळचे एकाच वस्तीवरील एकाच बुडक्यातील असल्याने त्यांच्या सदाशिवनगरमध्ये मोठा जल्लोष झाला.
निवडणुकीत शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखालील जनशक्ती ग्रामविकास पॅनेलने संभाजी पवार यांच्यासह रूपाली राजेंद्र पवार या दोन जागा जिंकल्या होत्या. तर बिनविरोध निवड झालेल्या इंदुताई वसंत गलंडे या त्यांच्याच विचाराच्या होत्या. तर विरोधी युवाशक्ती पॅनेलकडे पाच सदस्य होते. बहुमत असूनसुद्धा सरपंच पदावर एकमत होत नसल्याने युवा शक्तीच्या सुनंदा पवार व रूपाली कृष्णत पवार या दोन सदस्यांनी विरोधी गटाशी हातमिळवणी करत सरपंचपद ताब्यात घेतले. निवडणुकीत या दोघांना प्रत्येकी सहा मते मिळाली. तर अनिता आबासो गलंडे या तटस्थ राहिल्या. त्यामुळे विरोधी उमेदवारास केवळ दोन मतावर समाधान मानावे लागले.
या खेळीने राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत गावातील आ. गोरे गटाला चांगलाच ‘दे धक्का’ दिला आहे. नूतन सरपंच, उपसरपंचांचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, माजी आ. प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, सुरेंद्रदादा गुदगे, संदीपदादा मांडवे, शिवाजी सर्वगोड आदींसह खटाव-माण तालुक्यांतील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले. तर मायणी येथील अर्बन बँकेच्या हॉलमध्ये सरपंच, उपसरपंचांसह सत्ताधारी गटाचे सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांचा सुरेंद्र गुदगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदाशिवनगरमध्ये जल्लोष
सदाशिवनगर हे चांभारकी वस्तीचे सुधारित नाव आहे. या नावातील मूळ पुरुष सदू पवार यांना केसू व गेणू ही दोन मुले होती. यापैकी केसूचे कै. बाबूराव पवार तर गेणूचे महादेव पवार हे सुपुत्र आहेत. यापैकी कै. बाबूराव यांचे नातू उपसरपंच संभाजी पवार आहेत. कै. महादेव यांच्या सरपंच सौ. सुनंदा पवार या नातसून आहेत. त्यामुळे मुळ एकाच घरात दोन्ही पदे येण्याचा दुर्मीळ योगायोग चौथ्या पिढीत आला आहे. त्याअगोदर तिसर्या पिढीतील शिवाजी पवार व संजय पवार या दोघांनी ग्रामपंचायत, वि.का.स.सेवा सोसायटीच्या निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढविल्या आहेत. एका घरातच दोन पॅनेलचे नेते असल्यामुळे बर्याच वेळेला वस्तीवरील सर्वसामान्यांनी कुचंबना होत होती. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही घरांमध्ये दिलजमाई झाल्याने सर्वसामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.