येथील जे. सी. शहा पेट्रोल पंपावरून दुचाकीच्या डिक्कीतील अडीच लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. आज दुपारी तीन वाजता घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. घडलेली सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
वडूज : येथील जे. सी. शहा पेट्रोल पंपावरून दुचाकीच्या डिक्कीतील अडीच लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. आज दुपारी तीन वाजता घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. घडलेली सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
याबाबत घटनास्थळवरून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश बागल (रा. येरळवाडी, ता. खटाव) हे घराचे बांधकाम सुरू असल्याने ठेकेदाराला रक्कम देण्यासाठी पुसेगाव रस्त्यावरील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेले होते. तेथून त्यांनी अडीच लाख रुपये काढले. त्यानंतर ते शहा यांच्या पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने ते पेट्रोल भरणार्या कर्मचार्याशी बोलण्यात दंग असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली अडीच लाखांची रोख रक्कम असलेली पिशवी लांबविली.
भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांची टीम दाखल झाली. सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली आहेत.
याबाबत वडूज पोलिसांत घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.