उपविभागीय अधिकारी माण-खटाव यांच्या आदेशान्वये वडूज शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर वडूज नगरपंचायत व प्रशासकीय अधिकार्यांनी शहरामध्ये शुक्रवार, दि. 23 ते 30 एप्रिलअखेर ‘जनता कर्फ्यू’ जाहीर करण्यात आला असून, याबाबतचा निर्णय हुतात्मा स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.
वडूज : उपविभागीय अधिकारी माण-खटाव यांच्या आदेशान्वये वडूज शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर वडूज नगरपंचायत व प्रशासकीय अधिकार्यांनी शहरामध्ये शुक्रवार, दि. 23 ते 30 एप्रिलअखेर ‘जनता कर्फ्यू’ जाहीर करण्यात आला असून, याबाबतचा निर्णय हुतात्मा स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस तहसीलदार किरण जमदाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. युन्नुस शेख, सहायक पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख, नगराध्यक्ष सुनील गोडसे, उपनगराध्यक्षा किशोरी पाटील आदींसह नगरसेवक व इतर अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आजपर्यंत कोरोना बाधित रुग्ण, वैद्यकीय उपाययोजना व इतर तांत्रिक अडचणीबाबत साधक-बाधक चर्चा झाली. त्यानंतर कोरोना संसर्ग नियंत्रण करण्यासाठी आठ दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार अत्यावश्यक दुधाचे घरपोच रतीब सकाळी 6 ते 9 फक्त सुरू राहतील. तसेच खासगी व सरकारी बँक पूर्णपणे बंद राहतील. फक्त मेडिकल आणि वैद्यकीय सेवा चालू राहील. त्याचबरोबर आपत्ती जन्य कार्यालय चालू राहतील. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप सुरू असतील. तसेच ग्रामीण रुग्णालय व कातरखटाव येथे नित्यप्रमाणे लसीकरण व कोरोना चाचणी केली जाणार आहे.
बैठकीस नगरसेवक डॉ. महेश गुरव, शहाजी गोडसे, अनिल माळी, वचन शहा, सचिन माळी, संजय काळे, डॉ. प्रशांत गोडसे, राजेंद्र कुंभार, दीपक बोडरे, सोमनाथ जाधव, अमोल वाघमारे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
‘जनता कर्फ्यू’मुळे शेतकर्यांची गोची
वडूज नगरपंचायतकडून केला जाणारा ‘जनता कर्फ्यू’ आवश्यक असेल सुद्धा? मात्र खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकर्यांना याचा त्रास होणार आहे. कृषी सेवा केंद्र बंद केली तर शेतकर्यांची ससेहोलपट होईल. दुसरीकडे डिझेल पंपावर डिझेल देणे बंद झाले तर नांगरटीसह शेतीच्या कामामध्ये अडथळे निर्माण होतील, तरी प्रशासनाने काळजी घ्यावी. राज्य सरकार लागू करत असलेल्या लॉकडाऊनला अनुसरून वडूज नागरपंचायत प्रशासनाने नियम आखावेत. निदान एक दिवसा आड तरी कृषी सेवा केंद्र 7 ते 11 या वेळेत सुरू ठेवायला परवानगी द्यावी.
- अनिल पवार, प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना.