येथील ग्रामीण रुग्णालयातील अपुर्या कर्मचारी वर्गाचा फटका आता कोरोना संसर्ग परिस्थितीमध्ये चांगलाच बसू लागला आहे. कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित मृतदेह उचलण्यासाठी कर्मचारीच नसल्याने याठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांनाच अन्य कर्मचार्याला सोबत घेऊन कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह उचलावे लागत आहेत.
आकाश यादव
वडूज : येथील ग्रामीण रुग्णालयातील अपुर्या कर्मचारी वर्गाचा फटका आता कोरोना संसर्ग परिस्थितीमध्ये चांगलाच बसू लागला आहे. कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित मृतदेह उचलण्यासाठी कर्मचारीच नसल्याने याठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांनाच अन्य कर्मचार्याला सोबत घेऊन कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह उचलावे लागत आहेत.
तालुक्याचे मुख्यालय असलेल्या येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या कोरोना साथीच्या काळात कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यानंतर शहर परिसरात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधितांची झपाट्याने वाढ होऊ लागल्यानंतर गेल्या आठवड्यात येथील कोरोना सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. येथे 30 ऑक्सिजन बेड सुरू करण्यात आले आहेत. सध्या येथे एक वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे चार वैद्यकीय अधिकारी, सात परिचारिका, एक सफाई कामगार, तीन सुरक्षा रक्षक, दोन औषध निर्माते, एक प्रयोगशाळा सहायक असा अधिकारी, कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. शहराच्या लोकसंख्येचा विस्तार लक्षात घेता याठिकाणी असणारी 30 ऑक्सिजन बेडची व्यवस्था अपुरी ठरत आहे.
मंगळवारी (दि. 20) आ. शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासनासमवेत कोरोना आढावा बैठक झाली. त्यामध्ये ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन बेड वाढविण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यानुसार येथे आणखी 20 ऑक्सिजन बेड वाढविण्यात येणार आहेत. सध्या ग्रामीण रुग्णालयात दाखल असणार्या रुग्णसंख्येचा विचार करता वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे अनेकवेळा वैद्यकीय अधिकार्यांनाच रुग्णसेवेसंदर्भात बहुतांशी कामे करावी लागतात. सोमवारी (दि. 19) सायंकाळी एक कोरोनाबाधित महिला रूग्ण दगावली. त्यावेळी वडूज नगरपंचायतीची शववाहिका या कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आली होती. मात्र, रुग्णालयात कर्मचारीच नसल्याने शववाहिकेत मृतदेह ठेवण्यासाठी दुसरा दिवस उजाडला.
मंगळवारी (दि. 20) सकाळी यासंदर्भात मृत महिलेच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका कर्मचार्याला मदतीला घेऊन सेवेत असणार्या वैद्यकीय अधिकार्यांनीच पुरेशी दक्षता घेऊन स्वत: तो मृतदेह शववाहिकेत ठेवला. कोरोना बाधित मृतदेह पुरेशा कर्मचार्यांअभावी तासन्तास शवविच्छेदन गृहात राहत असल्याची स्थिती दिसून येत आहे. शिवाय मयताच्या नातेवाइकांनाही तासन्तास ताटकळत थांबण्याशिवाय पर्याय उरत नाही. अपुर्या अधिकारी, कर्मचारी वर्गाचा फटका कोरोनाबाधित रुग्णांना चांगलाच बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात पुरेसा वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
वडूज, औंध येथे कोरोना सेंटर सुरू करण्याबाबत आपण प्रांताधिकार्यांकडे पाठपुरावा केला. त्यानुसार येथे कोविड सेंटर तातडीने सुरू झाले. मात्र, आता याठिकाणी पुरेशा वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांची कमतरता जाणवत आहे. शासनाने याठिकाणी पुरेसे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल.
- धैर्यशील पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.