कोरोना महामारीच्या संकटा बरोबर महागाईचा सामना करावा लागतं आहे. गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात गत दिवाळीपासून सत्तर टक्याने वाढ झाली असून, सध्याचे दर सामन्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने मासिक किराणा साहित्य व महिलांचे बजेट कोलमडले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना, सामन्यांना महागाईला सामोरे जावे लागत आहे.
रणजित लेंभे
पिंपोडे बुद्रुक : कोरोना महामारीच्या संकटा बरोबर महागाईचा सामना करावा लागतं आहे. गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात गत दिवाळीपासून सत्तर टक्याने वाढ झाली असून, सध्याचे दर सामन्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने मासिक किराणा साहित्य व महिलांचे बजेट कोलमडले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना, सामन्यांना महागाईला सामोरे जावे लागत आहे.
कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. सर्वसामान्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. तेलाविना स्वयंपाकच होणार नसल्याने फोडणीला महागाईचा तडका बसला आहे. वाहतूक खर्च वाढल्याचा फटका आणि अपुर्या कच्या मालाचा तुटवडा याचा फटका सर्वत्र बसला आहे. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात महागाईच्या झळा सहन करण्याची वेळ सर्वांवरच आली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे हतबल झालेल्या शहरांतील अनेक कुटुंबांना गावाकडे येऊन राहण्याची वेळ आली आहे. यातून मिळेल ते काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यातच महागाईचा भडका उडाला आहे. डिसेंबरपासून सिलिंडरच्या दरातही शंभर ते सव्वाशे रुपयांनी वाढ झाली आहे. ग्रामीण भागांतील महिलांवर तर ‘आपली चूलच बरी’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. खाद्य तेलाला मात्र पर्याय नाही. स्वयंपाकासाठी खाद्यतेल आवश्यक आहे.
दसरा व दिवाळीत खाद्यतेलाचा वापर अधिक होत असल्यामुळे त्याचे काही प्रमाणात भाव वाढणे साहजिक होते.पण अपेक्षापेक्षा अधिकच भाव वाढल्याने व्यापारी तर चकित झाले आहेत. याचा सर्वात जास्त त्रास हा सर्वसामान्य कुटुंबांना होत आहे. अवकाळी पावसामुळे सोयाबीन, भुईमुगासह तेलबिया पिकांचे नुकसान झाल्याने त्याचा बाजारातील उलाढालीवर व भावावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन व भुईमूग पीक हातची गेल्याने त्याचा फटका व परिणाम तेलाच्या दरावर झाला आहे.
दिवाळीच्या दरम्यान 95 ते 98 रुपये असणार्या तेलाची किंमत सध्या प्रतिलिटर 135 ते 140 रुपये इतकी झाली आहे. शेंगतेल प्रतिलिटर 180 ते 210 रुपयांपर्यंत गेले आहेत. प्रतिलिटर पामतेल शंभर रुपयाच्या वर आहे. इतर कंपन्यांच्या किमतीत सुद्धा दरात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य मात्र बेजार झाले आहेत. नेहमीच्या वापरात येणारे तेल आणि कमालीच्या भाववाढीमुळे महिला वर्गांना यापुढे काटकसरी शिवाय पर्याय उरला नाही. अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाले. परिणामी, खाद्य तेलावर आधारित सर्व उत्पादनाच्या किमती वाढल्या, हॉटेल, उपहारगृहातील विविध खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. सामान्य लोकांची गरज लक्ष्यात घेता, सरकारने खाद्यतेल आयात करावे व तेलाची अधिक किमतीने विक्री करणार्याविरुद्ध अन्न व प्रशासन विभागामार्फत गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी व तेलाच्या किमती होण्याविषयी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.