‘संत नामदेवांपासून नारायण सुर्वेंपर्यंत समृद्ध साहित्य परंपरा असणारी मराठी अभिजात दर्जाला पात्र आहे. श्रमिक वंचित कष्टकर्यांच्या जगण्याला शब्दरूप देण्याचे व्रत मराठीने अंगीकारले आहे. हे आपल्या भाषेचे व संस्कृतीचे वेगळेपण होय,’ असे प्रतिपादन कवयित्री कुंदा लोखंडे-कांबळे यांनी केले.
मायणी : ‘संत नामदेवांपासून नारायण सुर्वेंपर्यंत समृद्ध साहित्य परंपरा असणारी मराठी अभिजात दर्जाला पात्र आहे. श्रमिक वंचित कष्टकर्यांच्या जगण्याला शब्दरूप देण्याचे व्रत मराठीने अंगीकारले आहे. हे आपल्या भाषेचे व संस्कृतीचे वेगळेपण होय,’ असे प्रतिपादन कवयित्री कुंदा लोखंडे-कांबळे यांनी केले.
येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागाने आयोजित केलेल्या ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी होते.
यावेळी प्रियांका शिंदे (बी. ए. भाग 2), पायल निकम (बी. ए. भाग 1), अंकिता घाडगे (बी. ए. भाग 1) यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले.
यानिमित्ताने निमंत्रितांचे कविसंमेलन घेण्यात आले.
तुडविल्या जरी भावना पायदळी
तरी सुगंध होऊन दरवळणे विसरले नाही
येतात जरी संकटे अनेक
तरी जिद्दीने उभे ठाकणे विसरले नाही
अशा शब्दात कवयित्री प्रा. रूपाली राऊत (वडूज) यांनी आपला आशावाद कवितेतून मांडला. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शेतीच्या कामात मदत करत शिक्षण घेतात, हे वास्तव मांडताना कवयित्री कुंदा लोखंडे म्हणाल्या,
गुरुजींची नजर वर्गात फिरली
दहा हजर पाच गैरहजर
न रहावून गुरुजींनी विचारलं,
अमका तमका - वैरणीला
अमकी तुमकी - खुडायला
कोण गेलंय - शाळू काढायला
कोण गेलंय - मळायला
त्याच वेळी वर्गातील विद्यार्थी गुरुजींना म्हणतात, ‘तुमचं शेत असेल तर आम्ही येऊ का शाळू काढायला?’ आणि गुरुजींचे डोळे पाणावतात. कवी प्रदीप माळी (मुंबई) यांनी सुशिक्षित बेरोजगार तरुण परिस्थितीने हतबल होतो आणि गैर मार्गाला लागतो याचे प्रभावी चित्र आपल्या ‘भावश्या’ या कवितेतून सादर केले. कवयित्री डॉ. हेमांगिनी माने यांनी आपल्या कवितेतून बालमजुरांचे प्रश्न मांडले, तर प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी यांनी आपल्या कवितेतून शेतकर्यांची व्यथा सादर केली.
याप्रसंगी कुंदा लोखंडे यांचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी स्वप्नील कांबळे यांची अनफळे ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांना एम. फिल. व पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून नियुक्ती मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
मास्क, सॅनिटायझेशन व सामाजिक अंतर या नियमांचे पालन करून कार्यक्रम पार पडला.
डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. विकास कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रा. डॉ. उत्तम टेंबरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. श्रीकांत कांबळे यांनी आभार केले.