विसापूर (ता. खटाव) येथील शेतकरी व माजी सैनिक जगन्नाथ रंगराव साळुंखे यांनी शनिवारी (दि. 13) वासराचे बारसे साजरे करीत अनोखी परंपरा जोपासली. साळुंखे यांच्या खिल्लार गाईला काही दिवसांपूर्वी खोंड झाला. ज्याप्रमाणे आपण गाईला आई मानतो त्याचप्रमाणे तिच्या वासराला मुलगा मानून त्यांनी या वासराचे बारसे गावातील श्री वाघेश्वरी व नवलाई देवी मंदिराच्या आवारात मंडप घालून, पाळणा सजवून, पाळणे गाऊन उत्साहात साजरे केले.
निढळ : विसापूर (ता. खटाव) येथील शेतकरी व माजी सैनिक जगन्नाथ रंगराव साळुंखे यांनी शनिवारी (दि. 13) वासराचे बारसे साजरे करीत अनोखी परंपरा जोपासली. साळुंखे यांच्या खिल्लार गाईला काही दिवसांपूर्वी खोंड झाला. ज्याप्रमाणे आपण गाईला आई मानतो त्याचप्रमाणे तिच्या वासराला मुलगा मानून त्यांनी या वासराचे बारसे गावातील श्री वाघेश्वरी व नवलाई देवी मंदिराच्या आवारात मंडप घालून, पाळणा सजवून, पाळणे गाऊन उत्साहात साजरे केले.
जगन्नाथ साळुंखे यांना खिल्लार जातीच्या पशुधनाचे संगोपन करण्याचा छंद आहे. साळुंखे यांच्या सोनी या गाईने काही दिवसांपूर्वी एका वासराला जन्म दिला होता. त्याचवेळी आपल्याला दूध देऊन आपले पोषण करणार्या या प्राण्याप्रती कृतज्ञता म्हणून वासराचे नामकरण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी ‘सोनी’ या गाईला व तिच्या वासराला अंघोळ घालून सजवून तिची विधिवत पूजा करून या नामकरण सोहळ्यासाठी तयार केले.
यावेळी वासराला छान सजविलेल्या पाळण्याजवळ ठेवून सोन्या असे नामकरण करण्यात आले. आणि त्यानंतर परंपरेनुसार सर्व महिलांना पेढे व बारशाच्या घुगर्या देऊन पाळणे म्हणण्यात आले. अन्नदान करण्यात आले. त्यामुळे विसापुरात या वासराच्या बारशाच्या समारंभाची लगबग पाहायला मिळाली.
दरम्यान, आपल्या मुलांप्रमाणे जनावरांनादेखील जीव लावणारे शेतकरी कुटुंब यानिमित्ताने पाहायला मिळाल्याची भावना पंचक्रोशीतील नागरिकांनी व्यक्त केली.
पूर्वी बैलगाडी शर्यत व शेतीसाठी खिल्लार बैलांची मागणी मोठी असायची. हे बैल सांभाळण्याचा खर्च जास्त असतो. आता शेतीचे यांत्रिकीकरण झाले असून, बैलगाडा शर्यती देखील बंद झाल्याने या बैलांचा वापरच राहिला नाही. त्यामुळे खिल्लार जातच नामशेष होईल की काय?, अशी भीती आहे. खिल्लार वंशाची जपणूक होणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण भागातील शेतकर्यांनी खिल्लार गाईंचे महत्त्व जाणून गोपालन करण्याची गरज असल्याचे साळुंखे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी हरिभाऊ सावंत, नवनाथ साळुंखे, बाळासाहेब सावंत, उमेश सावंत, भीमराव जगताप, मुरलीधर साळुंखे, गुलाबराव साळुंखे उपस्थित होते.
या स्तुत्य कार्यक्रमाचे विसापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून कौतुक केले जात आहे.