पोक्सो गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक
News By : Muktagiri Web Team
कराड, दि. 4 ः अल्पवयीन मुलीस अमिष दाखवून पळवून नेणाऱ्या रेकॉर्डवरील संशयित आरोपीस कराड शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्यावर बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगा करणे, मारहाण करणे, शासकीय कामात अडथळा करणे, शांतता भंग करणे यासारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात आहे. बज्या उर्फ बजरंग सुरेश माने (वय 30, रा. बुधवार पेठ, कराड) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सहा महिन्यापूर्वी बज्या माने याने एका अल्पवयीन मुलीस अमिष दाखवून पळवून नेल्यापासून तो फरार होता. त्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी डीवायएसपी अमोल ठाकूर, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेस या फरार आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की बज्या माने हा मंगळवारी कराड परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्याअनुषंगाने गुन्हे पथकातील पोलीस हवालदार आनंदा जाधव, महेश शिंदे यांनी वारूंजी फाटा येथे सापळा रचून थांबले असता बज्या माने याला पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, आनंदा जाधव, महेश शिंदे यांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे. बज्या माने याच्यावर विविध कलमाअंतर्गत सात गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष फडतरे करीत आहेत. सदरची कामगिरी डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, आनंदा जाधव, महेश शिंदे, संग्राम पाटील, सोनाली पिसाळ यांनी केली.