कराड, : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलांच्या शालेय परीक्षेपूर्वी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. या कार्यक्रमांतर्गत कराड दक्षिणमधील विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी (ता. २४) सकाळी १० वाजता विविध केंद्रांवर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे. तसेच २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. रेठरे बुद्रुक येथील कृष्णा महाविद्यालय, छत्रपती संभाजी विद्यालय, सौ. ताराबाई मोहिते विद्यालय, तसेच कोयना वसाहत येथील के.सी.टी. कृष्णा स्कूल या केंद्रांवर मंगळवारी (ता. २४) सकाळी १० वाजता चित्रकला स्पर्धा होणार असून, यामध्ये सुमारे १२०० विद्यार्थी-विद्यार्थींनी सहभागी होणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असून, सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपक्रमाचे संयोजक समीर पाटील, सतीश चव्हाण, महेश कापूरकर, निर्मला काशीद, मंजिरी कुलकर्णी, संतोष हिंगसे, तानाजीराव देशमुख यांनी केले आहे.