‘त्या’ युवकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही
News By : Muktagiri Web Team
राजकीय पक्षांच्या कार्यालयावर दगडफेक करणार्या तरुणांना आमदार शशिकांत शिंदे यांनी धमकी दिली आहे. पोलिसांनी संबंधित तरुणांची तक्रार नोंदवून घ्यावी. तसेच त्यांना त्यांचा जीव धोक्यात असल्याने त्यांना पोलिस संरक्षण द्यावे,’ अशी मागणी माथाडी नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
सातारा : ‘राजकीय पक्षांच्या कार्यालयावर दगडफेक करणार्या तरुणांना आमदार शशिकांत शिंदे यांनी धमकी दिली आहे. पोलिसांनी संबंधित तरुणांची तक्रार नोंदवून घ्यावी. तसेच त्यांना त्यांचा जीव धोक्यात असल्याने त्यांना पोलिस संरक्षण द्यावे,’ अशी मागणी माथाडी नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
नरेंद्र पाटील येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ’मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही म्हणून या समाजातील तरूण संतप्त झाले आहेत. ते कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते आहेत, याचा शोध लावत बसण्यापेक्षा आरक्षण देण्यात आपण कमी पडलो हे सरकारने मान्य करावे. आमदार शशिकांत शिंदे यांनी या दगडफेक करणार्या तरुणांच्या घरी जाऊन यांना धमकी दिली आहे. जेव्हा युतीचे सरकार सत्तेत होते, तेव्हा मराठा मोर्चाच्या वेळी महामार्गाच्या पुलाखाली दगड कुणी आणून ठेवले. कुठल्या आमदारांच्या सांगण्यावरून हे कृत्य केले गेले होते, हे सर्वांना माहीत आहे. आता आमदार शिंदे यांच्या भूमिकेत बदल झाला आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका बदलली आहे. आता न्यायालयाने आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री सांगताहेत वास्तविक हा निर्णय हा राज्यपातळीवर घ्यायला पाहिजे केंद्राचे याचा काही संबंध नाही. आरक्षण मिळाले नसल्याने मराठा समाजातील तरुणांच्या भावना तीव्र झालेले आहेत. ही मुले मराठा आहेत म्हणून तर त्यांनी रागातून दगडफेक केली. हे कुठल्या एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत असे आमदार शिंदे म्हणाले आहेत. या मुलांना धमकावले गेले आहे त्यामुळे त्यांना आम्ही वार्यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत. समाजाला आरक्षण देण्यात आणखी वेळ गेला तर मोठा उद्रेक होईल असा इशारा देखील पाटील यांनी दिला आहे.
पाटील पुढे म्हणाले, मराठा आरक्षण सुप्रिम कोर्टाने फेटाळले, याला कारण राज्य सरकारने चुकीच्या पद्धतीने युक्तीवाद केला आहे. त्यामुळे मराठा युवकांमध्ये मोठा असंतोष आहे. त्याच उद्विग्तनेतून गुरुवारी काही मराठा युवकांकडून कृत्य घडले आहे. मात्र, एक आमदार पोलिसांआधीच त्यांच्या घरी जावून धमकावत आहे. मात्र, त्या युवकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. त्यांच्या पाठीशी ठाम आहोत, जे सातारामध्ये घडले ते कमीच घडले. आरक्षणाच्या निर्णयाच्या असंतोषातून ही प्रतिक्रिया व्यक्त झाली होती. परंतु, एक आमदार त्या पोरांच्या घरी जाऊन धमक्या देतो. ही कसली संस्कृती? एस. पी. साहेबांनी यावेळचा व्हिडीओ पाहावा, त्यांनी जो व्हिडिओ दिला तो पोलिसांनी रेकॉर्डवर घ्यावा. त्या युवकांना पोलिस संरक्षण द्यावे, त्यांच्या घरातून कोणी तक्रार द्यायला आले तर पोलिसांनी नोंदवून घ्यावी . मराठा आरक्षणावर बोलण्यापेक्षा धमकीची भाषा वापरणार्यांचे मराठा जातीवरचे प्रेम हे पूतना मावशीचे प्रेम असल्याचा टोला नरेंद्र पाटील यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता लगाविला.
मी मराठा आहे.. कोणाच्या सर्टिफिकेेटची गरज नाही : आ. शशिकांत शिंदे
दरम्यान, माजी आ. नरेंद्र पाटील यांनी प्रथम अभ्यास करावा. जनतेच्या भावनांशी खेळू नये. मी मराठा आहे, यासाठी मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असे प्रत्युत्तर आ. शशिकांत शिंदे यांनी नरेंद्र पाटील यांच्या टिकेला दिले आहे. मी मराठा समाजाचे कधीही राजकारण केले नाही. मी प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी काम केले आहे. सातारा किंवा नवी मुुंबईमध्ये जी आंदोलने झाली त्यावेळी मी पुढाकार घेतला आहे. सातार्यात राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक करणारे युवक मराठाच होती. त्यांनी असंतोषातून काही निर्णय घेतला. मात्र, त्या युवकांच्या घरी जावून मी दमबाजी केली नाही. त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. सध्या त्या युवकांना मी मदत करत आहे. त्यांना न्यायालयीन प्रक्रियेत मदत करणार असून वार्यावर सोडणार नाही, असेही आ. शिंदे यावेळी म्हणाले.