वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी खराडे, ता. कराड येथील ग्रामपंचायतीने गावातील सार्वजनिक वाचनालयाला चौदाव्या वित्त आयोगातून स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृतीला बळ दिले आहे.
पिंपोडे बुद्रुक : वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी खराडे, ता. कराड येथील ग्रामपंचायतीने गावातील सार्वजनिक वाचनालयाला चौदाव्या वित्त आयोगातून स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृतीला बळ दिले आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व वित्त आयोग निधीतून पुस्तके मदत करण्याचा पहिल्यांदाच आणि स्तुत्य प्रयोग झाला आहे. गावच्या विकासात्मक कार्याबरोबर समृद्ध ज्ञानसंस्कृतीला महत्त्व देऊन या विधायक व प्रेरणादायी कार्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिकार्यांचे कौतुक होत आहे.
येथील ज्ञानार्जंनाचे कार्य करत असणार्या व जिल्हा ग्रामीण आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्राप्त, श्री स्वामी समर्थ वाचनालय, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी भरीव योगदान देत आहे. हाच धागा ओळखून सरपंच, ग्रामसेवक सर्व ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी विधायक व सामाजिक तसेच ज्ञान संस्कृतीला महत्त्व देत, गावाच्या वैभवात भर घालणार्या आणि आजच्या व उद्याच्या पिढीचे उज्ज्वल भवितव्य घडवणार्या ग्रंथालय व वाचनालयाला चौदाव्या वित्त आयोगातून वीस हजार रुपये किमतीची स्पर्धा परीक्षेची 65 पुस्तके, ग्रंथ उपलब्ध करून दिली आहेत. ही भूमिका इतर ग्रामपंचायत व सार्वजनिक ग्रंथालयांना दिशादर्शक ठरू शकते. या स्तुत्य उपक्रम व निर्णयाबाबत ग्रामपंचायत पदाधिकार्यांचे सर्व स्तरांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी सरपंच नवनाथ जाधव, ग्रा. पं. सदस्य विजय किरतकर, आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हणमंत जाधव, उमेश जाधव, मारुती जाधव, युवराज जाधव, गजानन जाधव, राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव जाधव, ग्रामसेवक माळी, विद्याप्रबोधिनी बुक डेपोचे आबासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रामपंचायत विकास आराखड्यातील चौदाव्या वित्त आयोगातील निधीतून पुस्तके मिळण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील तालुका गटविस्तार अधिकारी यांच्या मार्फत प्रयत्न व पाठपुरावा केला जाईल.
- हणमंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग