सूर्याचीवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रंजना मनोहर गायकवाड यांची तर उपसरपंचपदी रामचंद्र बाळासाहेब घोलप यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखालील नरसिंह ग्रामविकास पॅनेलने बहुमत प्राप्त केले आहे. निवडीनंतर सरपंच गायकवाड, उपसरपंच घोलप तसेच नवनिर्वाचित सदस्यांचा रणजित भैय्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
निमसोड : सूर्याचीवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रंजना मनोहर गायकवाड यांची तर उपसरपंचपदी रामचंद्र बाळासाहेब घोलप यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखालील नरसिंह ग्रामविकास पॅनेलने बहुमत प्राप्त केले आहे. निवडीनंतर सरपंच गायकवाड, उपसरपंच घोलप तसेच नवनिर्वाचित सदस्यांचा रणजित भैय्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी देशमुख यांनी गावच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. तर सरपंच गायकवाड म्हणाल्या, ‘पॅनेलचे नेते व सर्व सहकार्यांनी मोठ्या विश्वासाने आपणावर जबाबदारी सोपविली आहे. ती सर्वांच्या सहकार्यातून पार पाडली जाईल.’
यावेळी घोलप, रामचंद्र जगदाळे यांचीही मनोगते झाली.
या कार्यक्रमास वि.का.स.सेवा सोसायटीचे अध्यक्ष रघुनाथ पानस्कर, निवृत्त पोलीस पाटील गुलाबराव जगदाळे, गोरखशेठ पानस्कर, हणमंत घोलप, बाळासाहेब काळे, सुनील माने, सुदाम जगदाळे, अशोक सुर्वे, विनोद जगदाळे, भरत जाधव, सत्यवान खरात, रोहिदास खरात, लालासो जगदाळे, अंकुश गायकवाड, गोपीनाथ इंदलकर, शंकर निकम, दीपक खांडेकर आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप जाधव यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. माजी सरपंच पै. दत्ताभाऊ कदम यांनी आभार मानले.
शिक्षिकेच्या हाती सत्ता
सरपंच रंजना गायकवाड यांचे शिक्षण बी.ए.डी.एड्. आहे. त्यांनी गेली काही वर्षे मायणी, वडूज व अन्य ठिकाणी खासगी तसेच जिल्हा परिषद शाळेत अर्धवेळ शिक्षिका म्हणून सेवा बजावली आहे. मात्र, सध्या त्या पूर्णवेळ सामाजिक कार्यात सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्यातील गुणवत्ता व नेतृत्व गुण व संघटन कौशल्याची दखल घेऊन सर्वांनी एकमताने त्यांच्यावर सरपंच पदाची जबाबदारी सोपविली आहे.