‘काशीळ येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड रुग्णालय कराड व सातारच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. कराड व सातारा तसेच काशीळ परिसरातील नागरिकांना या रुग्णालयाचा लाभ होणार असून, या रुग्णालयामार्फत कोविड रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत,’ असा विश्वास पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
नागठाणे : देशासह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे बेड अपुरे पडत आहेत.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले असून येथे सुरू केलेल्या कोविड सेंटरमुळे ग्रामीण भागातील रुग्णांची होणारी धावपळ थांबणार असून येथे रुग्णावर चांगले उपचार होणार आहेत.त्यामुळे हे कोविड सेंटर ग्रामीण भागासाठी वरदान ठरणार आहे असे प्रतिपादन पालकमंत्री तथा सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
काशीळ (ता. सातारा) येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीदार आशा होळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते भरत माने, कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब पाटील म्हणाले की, सातारा येथील जंबो कोविड सेंटरच्या माध्यमातूनच या सेंटरचे काम चालणार आहे. येथे एकूण 63 बेड्सची व्यवस्था असून सध्या तातडीने 31ऑक्सिजन बेड टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.32 व्हेंटिलेटर बेड्सही लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की सातारा-कराड महामार्गावरील हे सेंटर मध्यवर्ती असून परिसरातील सर्वांना हे उपयुक्त ठरणार आहे. निधी नसल्यामुळे व मागच्या सरकारच्या दुर्लक्षामुळे रुग्णालयाचे काम रखडले होते. आमचे सरकार आल्यावर या कामाला गती मिळाली. त्यामुळे येथे सध्या खाजगी संस्थेच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देण्यात येणार असून लवकरात लवकर शासनाने येथे नियमित शासकीय वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांची नेमणूक करावी. त्यामुळे कोविड नंतरही सर्वसामान्य रुग्णांना सेवा उपलब्ध होईल अशी मागणीहि यावेळी त्यांनी केली.
नागठाणे पत्रकार संघाच्या पाठपुराव्याला यश
गतवर्षी कोरोनाकाळात मोठा गाजावाजा करून या ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मधल्या काळात रुग्णसंख्या कमी झाल्याने याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. फेब्रुवारीपासून पुन्हा पेशंट वाढू लागल्याने व बेड अपुरे पडू लागल्याने प्रशासनाची तारांबळ उडू लागली. मात्र, तरीही काशीळच्या कोविड सेंटरबाबत कोणत्याच हालचाली सुरू नव्हत्या. या घटनेची नागठाणे भाग पत्रकार संघाने गांभीर्याने दखल घेत येथील विविध दैनिकांच्या पत्रकारांनी आपापल्या दैनिकांमधून काशीळ येथे कोविड सेंटर सुरू करण्यासंदर्भात बातम्याद्वारे आवाज उठवला होता. त्याचीच दखल घेत प्रशासनाने तातडीने येथे हे सेंटर सुरू केले. त्यामुळे नागठाणे विभागातील सर्व पत्रकारांचे परिसरातील ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.