सध्या सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे येथील पुष्कर तलाव सुमारे 70 टक्के भरला आहे. तलावात साठलेल्या पाण्यामुळे शिंगणापूर गावासह पंचक्रोशीतील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. तसेच दुष्काळवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासनाच्या मदतीने 2014 पासून ग्रामपंचायतीने केलेल्या जलसंधारणाच्या कामाची पोचपावती मिळाल्याचेही गावकरी सांगत आहेत.
शिखर शिंगणापूर : सध्या सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे येथील पुष्कर तलाव सुमारे 70 टक्के भरला आहे. तलावात साठलेल्या पाण्यामुळे शिंगणापूर गावासह पंचक्रोशीतील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. तसेच दुष्काळवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासनाच्या मदतीने 2014 पासून ग्रामपंचायतीने केलेल्या जलसंधारणाच्या कामाची पोचपावती मिळाल्याचेही गावकरी सांगत आहेत.
महाराष्ट्र राज्यातील मोठे तीर्थक्षेत्र म्हणून शिखर शिंगणापूर, ता. माण या गावाला ओळखले जाते. दुष्काळी भागात असलेल्या शिंगणापूरला कोणत्याही बाजूने पाणी येणे सहजशक्य नाही. गावाच्या चारही बाजूने डोंगररांगा असून उंचावर वसलेले गाव असल्याने दुष्काळात पाण्याची मोठी वणवण करावी लागत असते.
गावाला दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. पर्जन्यमानाचे प्रमाण फार कमी, मात्र गेल्या 4 वर्षांत झालेली जलसंधारणाची कामे, सिमेंटचे बंधारे, नाला बंडिंग, लहान-मोठ्या विहिरीतील गाळ काढणे व खोलीकरण ही कामेच शिंगणापूरला वरदान ठरली आहेत. गावामध्ये डोंगरभागात झालेली डीप, सीसीटी व श्रमदानाची कामे मोठ्या प्रमाणात झाल्यानेच जमिनीची धूप थांबल्याने पर्जन्यमानाच्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे.
शिंगणापूर ग्रामपंचायतीने पुष्कर तलावातील काढलेल्या गाळामुळे पाणीसाठा वाढण्यास मोठी मदत झाली आहे. ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या आवाहनामुळेच पुष्कर तलावातील गाळ शेतकरी वर्गाने उचलल्याने पुष्कर तलावाची खोली वाढली आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पुष्कर तलावातील गाळ काढण्यात आल्याने पाणी साठ्यात लक्षणीय वाढ होऊन सध्याच्या स्थितीत पुष्कर तलाव 70 टक्के भरला आहे.