माण तालुक्यातील पळशी गाव हे शेतीच्या बाबतीत सधन समजले जाते. गेल्या दोन महिन्यांपासून या परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. या पावसाच्या जोरावर शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांची लागवड केली आहे.
पळशी : माण तालुक्यातील पळशी गाव हे शेतीच्या बाबतीत सधन समजले जाते. गेल्या दोन महिन्यांपासून या परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. या पावसाच्या जोरावर शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांची लागवड केली आहे. मात्र, पावसाने उघडीप दिली नसल्याने खरीप हंगामातील पिके ज्यादा पाण्याने धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, त्यामुळे संबंधित विभागाने पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
पावसाळ्याची सुरुवात मुळातच दमदार झाली. या दमदार पावसाने माणगंगा नदीवरील सिमेंट साखळी बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ओसंडून वाहिले व माणगंगा नदी ऐतिहासिक स्वरूपात पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रवाहित झाली आहे. परिसरातील ओढे-नाले भरभरून वाहत आहेत. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या कामांना मूर्त स्वरूप आले आहे असून, या कामांचे चीज झाल्याचे पाहायला मिळत आहे.
खरीप हंगामात शेतकरी वर्ग दमदार पावसाने सुखावला गेला. उन्हाळ्यात खरीप पूर्वहंगामाची जोरात तयारी केली होती.नांगरट करणे, शेतात खते घालून पाळ्या घालून पेरण्या करण्यात आल्या. यात प्रामुख्याने शेतकर्यांचे नगदी पीक ओळखले जाणारे हलवा कांदा याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे तर काही शेतकर्यांनी बियाण्याच्या उपलब्धतेनुसार कांद्याची पेरणी केली आहे. तसेच बाजरी, मका, वाटाणा, सोयाबीन, बियाण्याची व चार्याची मका पिके हाती घेतली आहेत.
पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी आनंदाला असला तरी ज्यादा पावसाने शेतजमिनीत पाणी साठले आहे.ज्यादा पाण्याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. यात अनेक शेतकर्यांची कांदा पिकासह अन्य पिके पाण्यात गेली आहेत. कांदा, बाजरी पिकांचे प्लॉटच्या प्लॉट पाण्याखाली गेल्याने नुकसान झाल्याने शेतकर्यांच्या सुरुवातीच्या आनंदावर विरजन पडले आहे.
बाजरी पिके पिवळी पडून त्याची वाढ खुंटली आहे तर कांद्याच्या मुळ्या पाण्याने नासल्याने हातातोंडाशी आलेली पिके ज्यादा पावसाने हिरावून घेतली आहेत. तसेच मका पीक जोमात असताना त्याच्यावर कीडचा प्रादुर्भाव झाला आहे. ही कीड आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी औषधांच्या फवारण्या करीत आहेत. मात्र, सततच्या पावसाने या कीटनाशक औषधाचा मात्रा लागू पडत नसल्याने औषधांचा खर्च पाण्यात गेला आहे.
देशात कोरोना साथीने थैमान घातले असताना आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तसेच उदरनिर्वाहासाठी शेतकर्यांना शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. मुख्यत: पावसाने सुरुवातीला दिलासा देऊन दुष्काळी परिस्थिती हटवली; मात्र अलीकडे पावसाचे प्रमाण वाढल्याने पिकांचे नुकसान होत आहे.त्यामुळे पिकांची पेरणी, खते, मशागतीचा खर्चही वाया गेला आहे.
- दत्तात्रय खाडे, शेतकरी, पळशी