विजयनगर येथील विलगीकरण कक्ष रोल मॉडेल ः माजी आमदार आनंदराव पाटील
ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हा परिषद शाळेत 30 बेडचा विलगीकरण कक्ष
Published:Jun 01, 2021 04:41 PM | Updated:Jun 01, 2021 04:50 PM
News By : Muktagiri Web Team
विजयनगर ग्रामपंचायतीने गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत विलगीकरण कक्ष सुरू केले आहे. या विलगीकरण कक्षात उपलब्ध सोयी, सुविधा व उपचार पहाता हे विलगीकरण कक्ष रोड मॉडेल - माजी आमदार आनंदराव पाटील
कराड : सातारा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या तपासण्या वाढविल्या आहेत. यामुळे लक्षणे विरहित किंवा सौम्य लक्षणे असणारे रुग्णांंचे त्वरित विलगीकरण करून त्यांच्यावर उपचार सुरू केले जात आहेत. त्यांच्यापासून पुढे होणारा संसर्ग रोखला जात आहे. यासाठी विजयनगर ग्रामपंचायतीने गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत विलगीकरण कक्ष सुरू केले आहे. या विलगीकरण कक्षात उपलब्ध सोयी, सुविधा व उपचार पहाता हे विलगीकरण कक्ष रोड मॉडेल ठरत असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार आनंदराव पाटील यांनी काढले.
विजयनगर ता. कराड येथे ग्रामपचांयतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये 30 बेडचे विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. याचा शुभारंभ माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा हुंदरे, डॉ. मकानदार, मंडलाधिकारी महेश पाटील, तलाठी कालमांडे, सरपंच संजय शिलवंत, उपसरपंच विश्वासराव पाटील उपस्थित होते.
राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी कोवीड सेंटरची संख्या वाढवून त्या ठिकाणी सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना त्या ठिकाणी ठेवल्यास त्याच्या कुटुंबियांना कोरोना संसर्ग होण्याच्या धोक्यापासून वाचविता येईल. त्याचप्रमाणे सौम्य लक्षणे असलेले रुग्ण सुपर स्प्रेडर बनून बाहेर फिरत असतात त्यालाही आळा बसेल. या उद्देशान विजयनगर ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये 30 बेडचे आयसोलेशन सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांची संख्या लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार अजून बेडची संख्या वाढवण्यात येणार आहे. या ठिकाणी बेड व्यवस्थेबरोबरच 24 तास सिसीटीव्हीची सोय तसेच स्त्री पुरूषांसाठी स्वतंत्र टॉयलेट बाथरूम, पाण्याची सोय करण्यात आली आहे.
माजी आमदार पाटील म्हणाले, कोरोनाची वाढणारी साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन बरोबर आयसोलेशन सेंटरची आवश्यकता आहे. गृहविलगीकरणामुळे संपूर्ण कुटुंब कोरोना बाधित होण्याचा धोका वाढत आहे. परिणामी तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे विजयनगर ग्रामपंचायतीने सुरू केलेला विलगीकरण कक्ष ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपुयक्त आहे.
यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी ग्रामपंचायतीच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाबाबत समाधान व्यक्त केले.