मुंबई महानगरपालिकांमध्ये ढेबेवाडी विभागातील शिलेदारांचा 'सिक्सर
News By : तळमावले I संदीप डाकवे
राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या आणि ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातील पाच प्रमुख महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या महानगरांमध्ये ढेबेवाडी विभागातील गावाकडच्या शिलेदारांनी नगरसेवक पदाचा ‘सिक्सर’ लगावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या घवघवीत विजयामुळे संपूर्ण विभागात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
ॲड. भारतीताई पाटील (मंद्रुळकोळे), डी. आर. पाटील (महिंद), सौ. अश्विनी माटेकर (माटेकरवाडी), विक्रांत सुरेश वायचळ (वायचळवाडी–कुंभारगाव), सौ. वैशाली मस्कर (येळेवाडी) आणि कु. दीक्षा कचरे (खळे) हे या नवनिर्वाचित नगरसेवक–नगरसेविकांचे चेहरे आहेत. जन्मभूमी वांगव्हॅली असली तरी कर्मभूमी मुंबईत या सर्वांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.
माथाडी नेते स्व. आण्णासाहेब पाटील यांच्या कन्या ॲड. सौ. भारती पाटील यांनी कोपरखैराणे विभागातून नवी मुंबई महानगरपालिकेत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या पतींनीही याच निवडणुकीत यश संपादन केले आहे.
पाटण तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानदेव रामचंद्र पाटील ऊर्फ डी. आर. पाटील यांनी प्रभाग क्रमांक २ (ड) मधून नगरसेवक म्हणून निवडून जात आपली राजकीय पकड सिद्ध केली आहे.
कुंभारगाव (माटेकरवाडी) येथील सौ. अश्विनी अशोक माटेकर या दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या असून, सातत्यपूर्ण जनसंपर्काचे फळ त्यांना मिळाले आहे.
वायचळवाडी (कुंभारगाव) येथील विक्रांत सुरेश वायचळ यांनी मानपाडा, मनोरमानगर व आझादनगर परिसरातून ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ (ड) मधून ७,७३१ मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे. युवक स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली १५ वर्षे सामाजिक कार्य करत त्यांनी ही मजल मारली आहे.
येळेवाडी (काळगाव) येथील रहिवासी असलेल्या सौ. वैशाली सुनील मस्कर यांनी घणसोली, नवी मुंबई प्रभाग क्र. ०९ (क) मधून भरघोस मतांनी विजय मिळवला. साईश्रद्धा सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून गेली दहा वर्षे केलेल्या समाजसेवेचे हे फलित आहे.
खळे येथील शिवसेना विभागप्रमुख सूर्यकांत कचरे यांच्या कन्या कु. दीक्षा कचरे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ (ड) मधून विजय मिळवत सर्वात तरुण नगरसेविका होण्याचा मान पटकावला आहे.
यापूर्वीही कुंभारगाव येथील दमयंती आचरे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून काम केले आहे.
मुंबईसारख्या महानगरात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या या नवनिर्वाचित सदस्यांकडून आता आपल्या मूळ भागातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


