कराड ः कराड तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुळसण (पाचुपतेवाडी) येथे एम डी ड्रग्ज तयार करणाऱ्या फॅक्टरी सुरू असल्याच्या संशयावरून जिल्ह्याबाहेरील विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये तालुका पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा सहभाग असल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. एवढी मोठी कारवाई तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत होत असून याबाबत स्थानिक पोलिसांना मात्र याचा थांगपत्ता सुद्धा नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळसण पाचुपतेवाडी भागातील एक जुना रेकॉर्डवरील गुन्हेगाराने बिहारमधील काही व्यक्तींना हाताशी धरून या फॅक्टरीमध्ये अमली पदार्थाचे उत्पादन सुरू केले होते. याबाबत संशयितांने मोठी गोपनीयता बाळगली होती. मात्र, जिल्ह्याबाहेरील टीमला याचा सुगावा लागताच त्यांच्या टीमने अचानक छापा टाकला. याबाबत टीमकडूनही गोपनीयता बाळगण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून यामध्ये कोणाकोणाची नावे समोर येतात हे पाहणे गरजेचे आहे. मागील काही महिन्यापूर्वीच कराडातील एका बड्या मद्य व्यावसायिकाचा मुलगाही ड्रग्ज प्रकरणामध्ये सापडला होता. त्या प्र्रकरणाचे आणि ह्या प्रकरणाचे काही कनेक्शन आहे का हे पोलिस तपासात समोर येईलच. मात्र, ह्या कारवाईमुळे तालुक्यात पुन्हा एकदा एम डी ड्रग्जचा काळाबाजार सुरू असल्याचे समोर आले आहे.