दरम्यान नियुक्त कर्मचाऱ्यांच्या अचूक कामकाबाबतचे प्रशिक्षण रविवारी दुपारी पार पडले. यामध्ये कर्मचाऱ्यांना अत्यंत काळजीपूर्वक व पारदर्शक काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कराड : प्रतिनिधी
सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने सर्व मतमोजणीची सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, अति. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह सर्व यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हेत्रे म्हणाले, मतमोजणी कामासाठी 230 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ईव्हीएम मशीनवरील मतमोजणीसाठी 24 टेबल तर टपाली मत मोजणीसाठी 12 टेबल सज्ज ठेवण्यात आले आहेत. टपाली मतमोजणी सकाळी १० वाजता तर ईव्हीएम मशीनद्वारे 10.15 मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक व अन्य एक चतुर्थश्रेणी कर्मचारी अशा ३ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकाच वेळी १२ गट व त्याअंतर्गत येणारे गण यांची मतमोजणी सुरू होईल. मतमोजणीसाठी वेगवेगळ्या मतमोजणी प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान निकाल हाती येण्यासाठी पाल गट 25, उंब्रज गट 22, मसूर गट 23, कोपर्डे हवेली गट 20, सैदापूर गट 20, वारुंजी गट 19, तांबवे गट 20, विंग गट 19, कार्वे गट 21, रेठरे बु. गट 23, काले गट 22, येळगाव गट 24 अशा फेऱ्या होणार असून सायंकाळी पाच वाजलेपर्यंत सर्व निकाल हाती येतील.