सह्याद्रीत वाघ पुनर्स्थापनेला मोठे यश ; ‘सेनापती’ व ‘चंदा’ यांचा एकत्र वावर
News By : Muktagiri Web Team
सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये वाघ पुनर्स्थापना प्रकल्पाला मोठे यश मिळाले असून STR-T1 (सेनापती) आणि STR-T4 (चंदा) या नर-मादी वाघांचा एकत्र वावर आढळून आला आहे. चांदोली वन्यजीव विभागांतर्गत आंबा वनपरिक्षेत्रात गेल्या आठवड्यापासून हे दोन्ही वाघ एकाच परिसरात वावरत असल्याची माहिती कॅमेरा ट्रॅप व वाघ संनियंत्रण पथकाच्या निरीक्षणातून स्पष्ट झाली आहे.
सह्याद्रीमध्ये वाघांची संख्या पुन्हा स्थिर करण्यासाठी सन २०१७ मध्ये सह्याद्री व्याघ्र राखीव, भारतीय वन्यजीव संस्था (WII) देहरादून व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) यांच्या संयुक्त सहकार्याने ‘वाघ पुनर्स्थापना प्रकल्प’ सुरू करण्यात आला. सन २०२७ पर्यंत मुक्त श्रेणीतील वाघांची इष्टतम संख्या निर्माण करणे व पर्यावरणीय अखंडता बळकट करणे, हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २०१७ ते २०२२ या कालावधीत भक्ष्य प्राण्यांची घनता वाढवण्यासाठी ‘प्रे ऑगमेंटेशन प्रोग्राम’ यशस्वीपणे राबवण्यात आला. हा टप्पा यशस्वी ठरल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील वाघ पुनर्स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यास ९ ऑक्टोबर २०२३ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या NTCA च्या चौथ्या तांत्रिक समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
या मंजुरीनुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व पेंच व्याघ्र प्रकल्पातून एकूण आठ वाघ (तीन नर व पाच मादी) सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये स्थलांतरित करण्यास केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मान्यता दिली. त्यानुसार ताडोबा येथील STR-T4 (चंदा) व STR-T5 (तारा) या वाघिणींचे यशस्वी स्थलांतर करण्यात आले.
मागील तीन वर्षांपासून सह्याद्रीमध्ये STR-T1 (सेनापती), STR-T2 व STR-T3 या तीन नर वाघांनी नैसर्गिक अधिवास निर्माण केला आहे. मात्र प्रजनन प्रक्रियेसाठी मादी वाघांची आवश्यकता असल्याने स्थलांतरित वाघिणींचा स्थानिक नर वाघांशी नैसर्गिक वावर होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते. आता STR-T1 व STR-T4 यांचा एकत्र वावर आढळल्याने ही प्रक्रिया यशस्वी दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
STR-T1 ‘सेनापती’ हा वाघ सह्याद्रीमध्ये विशाल क्षेत्रावर दबदबा निर्माण करून स्थिरावला असून STR-T4 ‘चंदा’ हिनेही त्याच अधिवासात सुमारे ३५ चौ. कि.मी. परिसरात नैसर्गिक वावर निर्माण केला आहे. या नर-मादी वाघांच्या एकत्र वावरामुळे सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये लवकरच वाघांची नैसर्गिक संख्या वाढण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.


