कराड : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कराड शहरातील मुजावर कॉलनी परिसरात वाघाचा वावर असल्याच्या अफवा पसरवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओमकार खंडु बोबाटे (रा. मुजावर कॉलनी, कराड) याने आज बुधवारी (दि. 29) विविध सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सॲपच्या माध्यमातून बनावट व्हिडीओ प्रसारित करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे वनविभागाच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
प्राप्त झालेल्या भ्रमणध्वनी संदेशानुसार वनविभागाच्या पथकाने तातडीने संबंधित ठिकाणी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र तपासाअंती त्या परिसरात वाघाचा कोणताही वावर आढळून आलेला नाही. तसेच परिसरातील कोणत्याही नागरिकाने वाघ प्रत्यक्ष पाहिल्याची माहितीही समोर आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर कराड वनविभागामार्फत नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावरील अप्रामाणिक व बनावट व्हिडीओ पुढे प्रसारित करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सदर संशयित व्हिडीओ अधिक तांत्रिक विश्लेषणासाठी कराड येथील सायबर क्राईम विभागाचे मा. पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. दोषी आढळल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत वनविभागाने दिले आहेत.
ही संपूर्ण कार्यवाही अमोल सातपुते, उपवनसंरक्षक सातारा आणि जयश्री जाधव, सहाय्यक वनसंरक्षक (वनी व कॅम्पा) सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली ललिता पाटील (वनक्षेत्रपाल, कराड), आनंद जगताप (वनपाल, मलकापूर), अक्षय पाटील (वनरक्षक, शेणोली), अभिजीत शेळके (वनरक्षक, नांदगाव) तसेच RRT टीमचे अजय महाडीक व रोहित कुलकर्णी यांनी केली.