कराड : कराड आणि मलकापूर नगरपालिकांच्या पंचवार्षिक निवडणुकांची धामधूम सुरू असताना मंगळवारी कराडमधील एका मोठ्या व्यावसायिकाच्या घरासह व्यवसायिक जागेवर आयकर विभागाने अचानक धाड घातल्याची माहिती समोर आली. मात्र रात्री उशिरापर्यंत कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून या कारवाईची अधिकृत पुष्टी करण्यात आली नव्हती. त्यामुळे संपूर्ण शहरात या कारवाईबाबत संभ्रम कायम राहिला.
मंगळवारी दोन्ही नगरपालिकांसाठी दिवसभर मतदान प्रक्रिया पार पडत होती. राजकीय वातावरण तापलेल्या स्थितीतच सायंकाळी कराडमध्ये आयकर विभागाने कारवाई केल्याच्या बातमीने शहरात खळबळ माजली. या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी कराड शहर पोलिसांनी प्रयत्न केले, मात्र ठोस तपशील मिळू शकला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यामुळे शहर व परिसरात या धाडीबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले. तरीदेखील रात्री उशिरापर्यंत कोणत्याही अधिकृत संस्थेकडून कारवाईला दुजोरा न मिळाल्याने परिस्थिती अनिश्चितच राहिली.