माण तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तालुक्यातील मुख्य शहर असणार्या दहिवडी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली आकर्षक मूर्ती, अतिभव्य व्यासपीठ, डोळे दिपवणारी होते. फटाक्यांची आतषबाजी व शिवभक्तांचा अलोट उत्साह अशा जबरदस्त वातावरणात दहिवडी व परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी झाली.
दहिवडी : माण तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तालुक्यातील मुख्य शहर असणार्या दहिवडी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली आकर्षक मूर्ती, अतिभव्य व्यासपीठ, डोळे दिपवणारी होते. फटाक्यांची आतषबाजी व शिवभक्तांचा अलोट उत्साह अशा जबरदस्त वातावरणात दहिवडी व परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी झाली.
शिवजयंती उत्सवानिमित्त दहिवडी येथील धर्मवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ज्योत घेऊन येणार्या शिवभक्तांना अल्पोपहार व मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. तर जाणता राजा शिवजयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने शहरातील बाजार पटांगणावर भव्य दिव्य सेट उभारण्यात आला होता. फुलांनी सजविण्यात आलेल्या सेटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा बसविण्यात आला होता. दिवसभर शिवभक्त याठिकाणी येऊन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत होते.
माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद सदस्य बाबासो पवार, माजी सभापती अतुल जाधव, नगराध्यक्ष धनाजी जाधव, अॅड भास्कराव गुंडगे, जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष महेंद्र अवघडे, प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय कार्याध्यक्ष मोहनराव जाधव, ग्राहक प्रबोधन समितीचे अध्यक्ष राजू मुळीक यांनी यावेळी भेट दिली व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद याठिकाणी पाहण्यास मिळाला.
मंडळातील युवा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे शहरातील वातावरण शिवमय झाले होते. तसेच पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवला होता.
तसेच तालुक्यातील पिंगळी बुद्रुक, बिदाल, आंधळी, तोंडले, मलवडी, शिंदी खुर्द, कुळकजाई या ठिकाणी सुद्धा शिवजयंती साजरी करण्यात आली. मलवडीतील तरुणांनी किल्ले प्रतापगड येथून शिवज्योत आणली होती. या शिवज्योतीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. बहुतांशी ठिकाणी शिवजयंतीचे पावित्र्य राखून ध्वनी यंत्रणेच्या माध्यमातून दिवसभर फक्त पोवाडे वाजविण्यात येत होते.