कराड नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत सोमवारचा दिवस कराड शहरासाठी ऐतिहासिक ठरला. सर्व ९ उमेदवार एकाच व्यासपीठावर येत नागरिकांसमोर आपले व्हिजन, विकास आराखडा आणि शहराबाबतची भूमिका मांडताना दिसले. सर्व उमेदवारांची शंभर टक्के उपस्थिती ही स्वतःमध्येच अनोखी आणि कराडसाठी अभिमानास्पद बाब ठरली.
शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटी येथील छत्रपती शिवाजी उद्यानाजवळ छ. शिवाजी उद्यान ग्रुपतर्फे हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कराड शहर शैक्षणिक, वैद्यकीय व व्यापारीदृष्ट्या वेगाने उभरत असताना, नागरिकांच्या मनात असलेल्या प्रश्नांना थेट उमेदवारांकडून उत्तर मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
चर्चासत्रात कोणत्याही उमेदवाराने एकमेकांविरोधात टीकास्त्र न वापरता केवळ विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले. कराड शहराचा दीर्घकालीन विकास, वाढती नागरी वसाहत, पायाभूत सुविधा, भविष्यातील प्राधान्यक्रम आणि शहराचे सर्वंकष व्हिजन याबाबत उमेदवारांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व उमेदवारांनी हातात हात घालून एकता आणि सकारात्मक राजकारणाचा संदेश दिला, हा कार्यक्रमातील सर्वांत लक्षवेधी क्षण ठरला.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला सभ्यता, सलोखा आणि विकासाचे राजकारण दाखवणारा हा उपक्रम कराडातच शक्य असल्याचे अनेक नागरिकांनी अभिमानाने नमूद केले.
छ. शिवाजी उद्यान ग्रुपतर्फे कराडकरांनी येणाऱ्या काळात शहराच्या हिताचा विचार करून सक्षम नेतृत्वाची निवड करण्याचे आवाहन करण्यात आले.