वाठार (ता. कराड) गावच्या हद्दीत नाशिकहून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात मंगळवारी पहाटेच्या सुमारास झाला. या दुर्घटनेत नऊ ते दहा विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या घटनास्थळी माहितीप्रमाणे, नाशिक येथील विद्यार्थ्यांची सहलीची बस कोकणात गेली होती. पहाटे कोकणातून नाशिककडे परतताना वाठार परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याचा अंदाज चालकाला न आल्याने बस नियंत्रण सुटून खाली घसरली. बस रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाच्या बाजूला कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच डीवायएसपी राजश्री पाटील, कराड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप तसेच पोलिस कर्मचारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढून मदतकार्य सुरू केले असून पुढील तपास सुरू आहे.