विद्यार्थ्यांच्या घरात, अंगणात तसेच घराशेजारील परिसरात विविध प्रकारे केलेल्या शैक्षणिक वातावरण निर्मितीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे घर हेच शाळा झाल्याची परिस्थिती वडगाव (ता. माण) येथे झाली आहे. जिल्हा परिषद शाळा वडगावचे मुख्याध्यापक संजय खरात यांनी घेतलेल्या कष्टाचे हे फलित आहे. माण पंचायत समिती सभापती कविता जगदाळे यांनी उपक्रमाची पाहणी करून उपक्रमाचे कौतुक केले.
दहिवडी : विद्यार्थ्यांच्या घरात, अंगणात तसेच घराशेजारील परिसरात विविध प्रकारे केलेल्या शैक्षणिक वातावरण निर्मितीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे घर हेच शाळा झाल्याची परिस्थिती वडगाव (ता. माण) येथे झाली आहे. जिल्हा परिषद शाळा वडगावचे मुख्याध्यापक संजय खरात यांनी घेतलेल्या कष्टाचे हे फलित आहे. माण पंचायत समिती सभापती कविता जगदाळे यांनी उपक्रमाची पाहणी करून उपक्रमाचे कौतुक केले.
संजय खरात यांनी कोरोनाने आलेल्या संकटावर मात करण्यासाठी वडगाव या गावामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी गृहभेटी दिल्या. तेवढ्यावरच न थांबता प्रत्येक घरी शालेय वातावरण तयार केले. त्यामुळे संपूर्ण गावात घरोघरी शाळा असे चित्र निर्माण झाले आहे. या उपक्रमास सभापती कविता जगदाळे, गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते व केंद्रप्रमुख नारायण आवळे यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी घरोघरी निर्माण केलेल्या शाळा पाहिल्या तसेच विद्यार्थ्यांशी व पालकांशी हितगूज केले. सोबतच या उपक्रमाचा व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
वडगाव गावामध्ये राबविण्यात येत असलेला ‘घरोघरी शाळा’ हा उपक्रम महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम असल्याचे मत सभापती कविता जगदाळे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या घरात, अंगणात तसेच घराशेजारील परिसरात विविध प्रकारे केलेल्या शैक्षणिक वातावरण निर्मितीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे घर हेच एक शाळा झाली आहे, असेही त्या म्हणाल्या. कोरोना सारख्या संकटाच्या काळातही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी संजय खरात यांनी घरोघरी शाळा निर्माण करुन विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू दिला नाही. त्यांचे हे कार्य इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत सोनाली विभूते यांनी व्यक्त केले.
केंद्रप्रमुख नारायण आवळे म्हणाले, ‘कोरोना सारख्या संकटाच्या काळात सुमारे तीन हजार पेक्षाही जास्त गृहभेटी देऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवणारे संजय खरात हे महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक असतील. या भेटीदरम्यान इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तके वाचनाबरोबरच विविध गोष्टीची पुस्तकेही वाचून दाखवली. संख्या वाचन, बेरीज, वजाबाकी याबरोबरच पाढे ही म्हणून दाखवले. पहिलीच्या काही मुलांनी स्वतःची ओळख इंग्रजीमधून करून दिली. तसेच विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक साहित्याचा कृतीयुक्त वापर करून दाखवला.
भेटीदरम्यान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय ओंबासे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व आभार मानले.