तळमावले : राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेपर कटींग आर्ट’ या आगळ्या वेगळ्या कलेच्या माध्यमातून डाॅ.संदीप डाकवे यांनी अनोखे पोट्रेट तयार केले आहे. या पोट्रेटची साईज 12 बाय 18 इंच इतकी आहे. खा.पवार यांना चित्रातून पण वेगळया पध्दतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी डाॅ.डाकवे यांनी हे पोट्रेट केले आहे. गतवर्षी डाॅ.संदीप डाकवे यांनी शरद पवार यांना वाढदिनी 81 पोस्टकार्ड पाठवली होती. या उपक्रमाची दखल "वर्ल्ड ग्रेटेस्ट बुक ऑफ रेकॉर्ड" या पुस्तकाने घेतली होती. तर त्यापूर्वी स्क्रिबलिंग मधून पवार यांचे चित्र रेखाटले होते. त्याची दखल प्रिंट आणि इलेक्ट्राॅनिक माध्यमांनी घेतली होती. डाॅ.संदीप डाकवे यांनी यापूर्वी जास्तीत जास्त मान्यवरांना त्यांची चित्रे भेट देणे, मराठी संपादकांना त्यांच्या वयाइतकी चित्रे भेट, 54 चित्रे भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा, लाॅकडाऊनमध्ये समाजप्रबोधन, 81 पोस्ट कार्डातून शुभेच्छा, 1 बाय 1 सेमी आकारात कलाकृती, 75 क्रांतीकारकांची चित्रे असे नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून कलेमध्ये 7 विश्वविक्रम केले आहेत. याशिवाय कलेच्या उपक्रमातून गरजूंना लाखो रुपयांची आर्थिक मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. ‘पेपर कटींग आर्ट’ मधून डाॅ.संदीप डाकवे यांनी शरद पवार यांच्या साकारलेल्या अनोखे पोट्रेट चे परिसरातून कौतुक होत आहे.