भांड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू
News By : विटा | दीपक पवार
विटा, ता. १० : येथील सावरकर नगरमध्ये भांड्याच्या दुकानाला भीषण आग लागून चौघांचा श्वास गुदमरून व भाजून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. विष्णू पांडुरंग जोशी ( वय ४४ ), सुनंदा विष्णू जोशी ( वय ४० ), प्रियंका योगेश इंगळे ( वय २५ ), सृष्टी योगेश इंगळे ( वय २ वर्षं ) अशी मृत्यू झालेल्यांची नांवे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, की येथील सावरकरनगरमध्ये जोशी यांचे श्री जय हनुमान स्टील अँड फर्निचरचे दुकान आहे. आज सकाळी अचानक दुकानला आग लागली. बघताबघता आगीने रौद्ररूप धारण केले. दुकानाच्या वरील मजल्यावर जोशी कुटुंबिय राहण्यास होते. अचानक आग लागल्याने कुटुंब भयभीत व गोंधळून गेले. घरातून बाहेर जाण्यासाठी आग लागलेल्या दुकानातून रस्ता असल्याने कुटुंबांना बाहेर पडता येईना. आगीने धुराचे लोट व आगीच्या ज्वालाने या कुटुंबातील चौघांचा जीव गुदमरू लागला. नागरीकांनी विटा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचा पाचारण केले. नागरीकांची मोठी गर्दी झाली. आमदार सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हेही घटनास्थळी दाखल झाले. तेही नागरीकांच्या मदतीने आग विझविण्यासाठी सरसावले. अग्निशमन दल व नागरीकांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. पलूस, कडेगांव येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलातील जवानांनी नागरीकांच्या मदतीने खिडकी व भिंत फोडून दुकानाच्या वरच्या मजल्यावर अडकलेल्या चौघांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांचा श्वास गुदमरला होता. जखमींना विटा येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना जोशी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. याची विटा पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.


