देशातील जिल्हा बँकांचे राष्ट्रीय फेडरेशन स्थापन करणार ः रामराजे नाईक निंबाळकर
News By : Muktagiri Web Team

मुक्तागिरी वृत्तसेवा मुंबई : जिल्हा बँकांच्या विविध प्रश्नांसाठी देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे राष्ट्रीय पातळीवर फेडरेशन स्थापन करणार असल्याची घोषणा विधान परिषदेचे माजी सभापती, सातारा जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली. मुंबई येथे झालेल्या बैठकीत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ही घोषणा केली. बैठकीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक व सहकार भारतीचे अध्यक्ष सतिश मराठे, माजी सहकार व पणन मंत्री व बँकेचे संचालक आ. बाळासाहेब पाटील, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, रायगड जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. जयंत पाटील, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सिंधुदूर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, पुणे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरूध्द देसाई, रायगड जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे विविध प्रश्नांवर विचार विनिमय व चर्चा झाली . यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची बदलती आर्थिक स्थिती व भूमिका, देशात नवीन 2 लाख विकास सेवा संस्थांची नेांदणी, जिल्हा बँकांची दिर्घ मुदत निधी व भांडवल उभारणी, जिल्हा बँकांपुढे कायदेशीर नियामक आणि तंत्रज्ञान विषयक आव्हाने, जिल्हा बँकांचे राष्ट्रीय स्तरावर फेडरेशन स्थापन करणेबाबत फेडरेशनसाठी देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची कार्यशाळा आयोजित करणे इत्यादि विषयांवर सखोल चर्चा झाली . तद्नंतर आयोजित करावयाची कार्यशाळा व राष्ट्रीय फेडरेशनसाठी निमंत्रक म्हणून आ. रामराजे नाईक निंबाळकर, सह निमंत्रक, सतिश मराठे व सचिव डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी कामकाज पहावे असे सर्वानुमते ठरले . यावेळी आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हा बँकांचे विविध प्रश्नांसाठी देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे राष्ट्रीय पातळीवर फेडरेशन स्थापन करणार असलेचे सांगितले . सर्व संबंधितांशी चर्चा करून नजीकच्या कालावधीत कार्यशाळा आयोजित करणेचा निर्णय झाला.