अत्याचार पीडित अल्पवयीन मुली व स्त्रियांना त्वरित न्याय मिळण्यासाठी कायमस्वरूपी स्वतंत्र विशेष न्यायालय मिळण्याबाबत व फाशी सारख्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी होण्यासाठी कायद्यात योग्य ते बदल करण्याबाबत मराठा क्रांती मोर्चा, फलटण यांनी प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांना निवेदन दिले.
फलटण : अत्याचार पीडित अल्पवयीन मुली व स्त्रियांना त्वरित न्याय मिळण्यासाठी कायमस्वरूपी स्वतंत्र विशेष न्यायालय मिळण्याबाबत व फाशी सारख्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी होण्यासाठी कायद्यात योग्य ते बदल करण्याबाबत मराठा क्रांती मोर्चा, फलटण यांनी प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांना निवेदन दिले.
निवेदनातील अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून कोपर्डी, तांबडी-रोहा येथील अल्पवयीन मुली व महिलांना पळवून नेऊन सामूहिक बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्या करणार्या अतिशय संतापजनक घटना घडलेल्या आहेत. आजही समाजात दहशत निर्माण होईल व त्यामुळे मुलींना व महिलांना समाजात मोकळे फिरणे मुश्कील होईल, तसेच मानवी समाजाला व माणुसकीला कलंक निर्माण होईल, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे.
सदरच्या घटना महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला काळिमा फासणार्या आहेत. अशा घटना वाढीस लागण्याचे कारण म्हणजे अशा प्रकारचे गुन्हे न्यायालयात त्वरित सुनावणीस न येणे व आरोपींना कठोरात कठोर म्हणजेच फाशी सारखी सजा न होणे. तसेच आरोप सिद्ध होऊनही सदर शिक्षेची अंमलबजावणी त्वरित न होणे हे आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कोपर्डी (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथील सामूहिक बलात्कार व निर्घृण हत्यामध्ये आरोपींना फाशी होऊन सुद्धा अजूनपर्यंत फाशीची अंमलबजावणी झालेली नाही. सदर सजेची त्वरित अंमलबजावणी न झाल्याने आरोपींमध्ये कायद्याच्या नावाचा धाक किंवा दहशत निर्माण होत नाही. त्यामुळे आरोपी तर मोकाट सुटतातच शिवाय अशा गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. अशा आरोपांचा त्वरित निवाडा होऊन पीडितेला त्वरित न्याय मिळावा, यासाठी लोकभावना अत्यंत तीव्र असतात. यामुळेच हैद्राबाद येथील एन्काऊंटरच्या घटनेला प्रचंड जनाधार मिळाला होता. एकूणच त्वरित न्याय मिळावा हीच सर्व समाजाची इच्छा असलेली दिसते. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे न्यायालयात त्वरित चालवून आरोपींना फाशीसारखी कडक शिक्षा होण्यासाठी व अशा खटल्यांसाठी अॅट्रॉसिटी कायद्याच्या धर्तीवर कायमस्वरूपी स्वतंत्र विशेष न्यायालयाची स्थापना करणे आवश्यक वाटते.
तसेच आरोपींना ठोठावलेल्या जन्मठेप, फाशी आदी शिक्षा त्वरित अंमलात येण्यासाठी कायद्यामध्ये योग्य बदल करण्याची वा नवा कायदा करण्याची आवश्यकता आहे. असे गुन्हे चालवण्यासाठी अॅट्रॉसिटी कायद्याच्या धर्तीवर विशेष न्यायालयाची स्थापना करून जलदगतीने सुनावणी घेऊन गुन्हेगारांना त्वरित फाशी सारखी सजा मिळेल. तसेच अशा फाशी सारख्या सजेची जलदगतीने अंमलबजावणी होण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल तातडीने करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे मराठा क्रांती मोर्चा फलटणने सरकारकडे केली आहे.