खटाव तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत असून, तालुक्यातील शेतकर्यांना, लोकांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली असल्याने उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यात सोडावे, अशी मागणी आज नगरसेवक शहाजीराजे गोडसे मित्र मंडळाने केली आहे. याबाबत तहसीलदार किरण जमदाडे यांना लेखी निवेदन दिले आहे.
वडूज : खटाव तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत असून, तालुक्यातील शेतकर्यांना, लोकांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली असल्याने उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यात सोडावे, अशी मागणी आज नगरसेवक शहाजीराजे गोडसे मित्र मंडळाने केली आहे. याबाबत तहसीलदार किरण जमदाडे यांना लेखी निवेदन दिले आहे.
यावेळी नगरसेवक शहाजीराजे गोडसे, माजी सभापती संदीप मांडवे, सामाजिक कार्यकर्ते विजयदादा शिंदे, मधुकर मोहिते, शिवसेनेचे आबासाहेब भोसले, सुशांत पार्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनातील अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यात प्रत्येक वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी शासन टँकरने पाणीपुरवठा करीत असते. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असतो. शिवाय शासकीय यंत्रणेवर व अधिकार्यांवर याचा भरपूर ताण पडत असतो. तसेच गावोगावी टँकरच्या पाण्यावरून वाद निर्माण होत असतात. त्यामुळे उरमोडीचे पाणी जर कॅनॉलने सोडले तर त्या-त्या गावचे बोअरवेल, विहरीचे स्तोत्र बळकट होऊन पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.
तसेच दोन वर्षांपूर्वी खटाव तालुक्यात दुष्काळ पडला होता. गेल्या वर्षापासून कोरोनाचे संकट, आता वीजबिल भरण्याचा तगादा, शेतीमालाला दर नाही, त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नाहीत, त्यामुळे अशा सर्व परिस्थितीत शेतकरी वर्ग पूर्णपणे कोलमडून गेला असून शेतकरी मरणयातना भोगत आहे. ही सर्व परिस्थिती आपण वरिष्ठांच्या निदर्शनास आणून उरमोडीचे पाणी सोडल्यास तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटून आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी कसा बसा जगू शकतो. त्याचबरोबर शासनाचा टँकरचा खर्च वाचून लोकांच्या पिण्याचा प्रश्न ही सुटू शकतो.
तरी पाण्यासाठी जनतेचा उद्रेक होऊन उग्र आंदोलन होण्या अगोदरच उरमोडीचे पाणी खटाव तालुक्याला देऊन पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
..अन्यथा उद्रेक होईल
खटाव तालुक्याला दुष्काळी यादीत समाविष्ट करण्यासाठी आम्हाला आंदोलनाचा बडगा उगारावा लागला. आता तालुक्यातील शेतकरी आणि जनेतला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे अशा अडचणीत व्यावसायिक दृष्टिकोन बाजूला ठेवून, याविषयाबाबत तातडीने निर्णय घ्यावा. हा निर्णय लवकर न झाल्यास जनतेला सोबत घेऊन मोठे आंदोलन उभारले जाईल आणि याचा उद्रेक होईल, असा इशारा शहाजीराजे गोडसे मित्र मंडळाचे विजयदादा शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.