गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
News By : Muktagiri Web Team
कराड, दि. 14 ः पंढरपूरहून कराड तालुक्यात गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. त्यांच्याकडून चार किलो गांजासह गुन्ह्यात वापरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. कराड पोलीस उपअधिक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने पंढरपूर-मसूर मार्गावर माळवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत शनिवारी रात्री ही कारवाई केली. संतोष हनुमानसिंग चंदेले (वय 48) व सोमनाथ दिलीप चंदेले (वय 18, दोघेही रा. संतपेठ, सांगलीरोड, पंढरपूर, जि. सोलापूर) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर भागातून कराड तालुक्यात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी सहाय्यक निरीक्षक अमित बाबर यांच्यासह सहाय्यक निरीक्षक विठ्ठल शेलार, उपनिरीक्षक अनिल पाटील, अंमलदार असिफ जमादार, प्रशांत चव्हाण, प्रवीण पवार, सागर बर्गे, दीपक कोळी, अमोल पवार, अमोल फल्ले, महेश घुटुगडे यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार या पथकाने पंढरपूर-मसूर मार्गावर माळवाडी गावच्या हद्दीत सापळा रचला. त्यावेळी पंढरपूरहून मसूरच्या दिशेने निघालेली रिक्षा पोलिसांनी थांबवली. रिक्षातील प्रवाशांकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे पोलिसांनी रिक्षाची झडती घेतली असता रिक्षामध्ये 3 किलो 948 ग्रॅम वजनाचा 74 हजार 310 रुपये किमतीचा गांजा मिळून आला. पोलिसांनी गांजासह रिक्षा असा एकूण 1 लाख 74 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करून त्यांना मसूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार तपास करीत आहेत.