डंपरच्या संरक्षणासाठी एजंटाची धावपळ पाटण तालुक्यात उत्खनन करून कराड तालुक्यातील उंब्रजसह इतरत्र वीटभट्टयांसाठी सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या कारवाईच्या ससेमिरा वाचवण्यासाठी ही वाहतूक आडमार्गाने केली जात असून या माती वाहतूक करणार्या डंपरला संरक्षण देण्यासाठी एजंटाचा धावपळ सुरू आहे.
कराड-चिपळूण महामार्गावरच्या पोलिस प्रशासन आणि इतरांना चकवा देण्यासाठी नेरळे- मानगाव-कुसरुंड-नवारस्ता वाहतूकीचा रस्ता सध्या भलताचं जोमात आहे. पाटण तालुक्यातील माती उत्खनन विविध कारणांनी चर्चेत असतानाच प्रशासनाच्या हातावर तुरी देण्यासाठी माती व्यावसायिकांच्या कुलप्त्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. मातीचे उत्खन्न, वाहतूक, याचबरोबर विक्रीबाबतचे शासन नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र पाटण तालुक्यात असून कराड तालुक्यातील उंब्रजसह इतरत्र छुप्या मार्गाने वाहतूक करून मातीचा पुरवठा होत आहे. पाटण तालुक्यातील माती प्रश्न इतका वाजला आणि गाजला की अनेकांची पळता भुई थोडी झाली. या खेळात अनेकांनी आपली पोळी पद्धशीर भाजून घेतली. महसूल प्रशासनाने बराचं काळ टाळाटाळ करुन अखेर परवाने दिली. पाटण तालुक्यातील माती तालुक्यातीलचं भूमिपुत्रांना मिळावी या हेतू ने दै. मुक्तागिरीने लाल सोनं जपा या उद्देशाने लिखाण केले. तालुक्यातील भट्टी धारक रखडत बसले आणि बाहेरची प्यादी परवानग्या घेऊन माती भूईसपाट करु लागली. प्रशासकीय परवानगी घेऊन एक दीड महिने झाले तरी अद्याप काही बहाद्दरांची लाल मातीची लूट काही थांबली नाही. उंब्रजला विटभट्टीसाठी जाणारी माती पाटण-नवारस्ता मार्ग सोडून कुसरुंड नवारस्ता मार्गे जाऊ लागली आहे. अतिप्रमाणात भरलेले डंपर नेरळेच्या चढावरुन चढत ही नाहीत. कुसरुंड, सोनवडे इथला चिंचोळा रस्ता आणि हे ओव्हरलोडेड डंपर भीषण अपघातास निमंत्रण देणारे ठरणार आहेत. याचा नाहक त्रास सर्वसामान्य वाहनधारकांना सोसावा लागत आहे. माती वाहतूक करायची तर आम्ही कुठून का करेना ही कारणे देणारे व्यावसायिक सोईस्कर रस्ता सोडून आडमार्गाने का जात आहेत. कराड तालुक्यात जीपीएस सिस्टीम आहे ती पाटणला का होत नाही? पाटणची बहुतांश माती उंब्रज कराड आणि कुठं कुठं आणि कोणा कोणाच्या नावाखाली जात आहे हे विचार करायला लावणारे आहे. ज्या डंपर मधुन वाहतूक होत आहे. त्याच पुढे व मागे नंबर ठळक अक्षरात असणं गरजेचे आहे कारण यांची लपाछपी एखाद्याच्या जीवावर बेतायची. आडमार्गाने होणारी ओव्हरलोडेड डंपर माती वाहतूक नक्कीचं एखादा भीषण अपघात करणार आहे हे नक्की आहे. डंपल धारकांचे परवाने आहेत तर लपूनछपून पळ का काढत आहेत. कराड-चिपळूण महामार्गावर वाहतूक करताना हेच डंपर धारक निम्म्याहून अधिक रस्तावर कब्जा करतात मग हा चिंचोळा रस्ता आणि इथली वाहतूक सर्वसामान्यांच्या जीवावरच बेतणार आहे.