‘स्वातंत्र्यसैनिका’ची ‘लेक’ बनली पोलीस अधिकारी
News By : Muktagiri Web Team
सध्या शिक्षणाची गंगा खेडोपाड्यापर्यंत पोहोचल्यामुळे ग्रामीण भागातील मुलीही जिद्द, चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावर आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवताना दिसताहेत. यातीलच एक उत्तम उदाहरण म्हणजे अनफळेतील स्वातंत्र्यसैनिकाच्या ‘लेकी’नं पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मारलेली मजल...त्याच जयश्री कांबळेंच्या खडतर कहाणीवर टाकलेली ही अल्पशी नजर...
विकी जाधव
सातारा : सध्या शिक्षणाची गंगा खेडोपाड्यापर्यंत पोहोचल्यामुळे ग्रामीण भागातील मुलीही जिद्द, चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावर आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवताना दिसताहेत. यातीलच एक उत्तम उदाहरण म्हणजे अनफळेतील स्वातंत्र्यसैनिकाच्या ‘लेकी’नं पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मारलेली मजल...त्याच जयश्री कांबळेंच्या खडतर कहाणीवर टाकलेली ही अल्पशी नजर...
खटाव तालुक्यातील अनफळे गावातील एका सर्वसामान्य कुटुंबात 14 फेब्रुवारी 1989 रोजी जयश्री कांबळेंचा जन्म झाला. वडील स्वातंत्र्यसैनिक तर आई गृहिणी. जयश्री यांनी 1 ते 6वी पर्यंतच्या शिक्षणाचे धडे सातार्यातील युनियन स्कूलमध्ये गिरवले. नुकतीच जयश्री यांची प्राथमिक शिक्षण घेण्यास सुरुवात झाली होती. त्याचवेळी कांबळे कुटुंबीयांवर नियतीनं घाला घातला. म्हणजे जयश्री या लहान होत्या त्यावेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले अन् त्या पितृछत्राला पोरक्या झाल्या. तरीही त्यांच्या आईनं धीर न सोडता त्यांना आत्मिक पाठबळ दिलं. पुढे त्यांनी 7 ते 10वी पर्यंतचे शिक्षण मायणीच्या वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेत पूर्ण केले. नंतर 11 व 12वीचे शिक्षण भारतमाता ज्युनिअर कॉलेज, मायणी येथे घेतले. तसेच विटा येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या अध्यापक विद्यालयातून त्यांनी डी.एड.ची पदवी संपादन केली. त्यानंतर मुक्त विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयातून बी.ए. पूर्ण केलं.
पोलीस खात्यात भरती होण्याचं स्वप्न लहानपणीच उराशी बाळगलेल्या जयश्री कांबळे यांनी 2016 पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी इस्लामपूर येथील महाराष्ट्र अॅकॅडमीत प्रवेश घेतला. पुढे त्या योग्य नियोजन करून अभ्यास करत राहिल्या. दरम्यानच्या काळात घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांची आई सविता या दिवसरात्र शिवणकाम तसेच इतर कामे करून जयश्री यांना आर्थिक सहकार्य करत होत्या. अभ्यास करताना जयश्री यांना प्रत्येक क्षणी आईच्या खडतर कष्टाची जाणीव होत होती.
त्यातच त्यांच्या वडिलांनी सैन्यदलात सेवा केल्यामुळे त्यांच्या पोलीस होण्याच्या स्वप्नाला आणखी बळ मिळत गेलं. त्यावेळी त्यांनी ठरवलं कितीही कष्ट घ्यावे लागले तरी पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारायचीच. पुढे त्यांनी नव्या जोमानं नियोजनात्मक मेहनतीच्या जोरावर एमपीएससी मार्फत 2017 मध्ये घेण्यात आलेली पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाची परीक्षा दिली. त्यात त्या उत्तीर्ण ही झाल्या. पुढे 2018 मध्ये मुलाखत घेण्यात आली, त्यातही त्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर उत्तीर्ण झाल्या. नंतर पीएसआय परीक्षेचा अंतिम निकाल 8 मार्च 2019 रोजी जाहीर करण्यात आला. यामध्येही त्यांनी बाजी मारली. हे सर्व टप्पे पार करताना त्यांना अनेक अडचणी आल्या. तरीही त्या न डगमगता मार्गक्रमण करत राहिल्या. दरम्यानच्या काळात त्यांना आई व दोन भावांची खंबीर साथ लाभली.
जयश्रीताई पुढे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या ट्रेनिंगसाठी नाशिक येथील ‘महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी’मध्ये 7 जानेवारी 2020 रोजी रुजू झाल्या. खरंतर पीएसआयचे ट्रेनिंग हे बारा महिन्यांचे असते. पण त्यांना हे ट्रेनिंग कोरोनामुळे पंधरा महिने करावे लागले. त्यांना या काळात प्रशिक्षणार्थी सोडले तर कुणाशीही भेटता येत नव्हते. तरीही त्यांनी शारीरिक आणि मानसिक कसोटीची परीक्षा पाहणारं हे खडतर ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केलं. त्यानंतर त्यांचा 30 मार्च 2021 शपथविधी घेण्यात आला. काही कालावधीनंतर म्हणजे 9 एप्रिल 2021 रोजी त्या इस्लामपूर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाल्या.
अशाप्रकारे जयश्री कांबळे यांनी ग्रामीण पार्श्वभूमी असतानाही केवळ जिद्दीच्या जोरावर मिळवलेल्या या यशाने अनफळे गावच्या मातीचा नव्याने सन्मान झाला आहे. त्यामुळे कांबळे यांचे हे खडतर व प्रेरणादायी यश ग्रामीण भागातील मुलींच्या स्वप्नांना नक्कीच बळ देणारे आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही..!
पॅशन असेल तर या...
खाकी वर्दीचे ग्लॅमर म्हणून फक्त झगमगाटाला भुलून या क्षेत्रात यायचे तर अजिबात येऊ नका. तुमच्यात पॅशन पाहिजे, सर्व प्रकारच्या लोकांचा सामना करण्याची तुमच्यात रग पाहिजे. चौकटीच्या पलीकडचे तडजोडीचे आयुष्य जगण्याची इच्छा असेल तरच या, अन्यथा दुसरे क्षेत्र निवडा, असे जयश्रीताई आवर्जून सांगतात.माझ्या लेकीनं मी दिवसरात्र घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून स्वत: जिद्द, चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींनीही प्रत्येक संकटाचा धैर्यानं सामना करून उच्च शिक्षण घेऊन आपलं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे.
- सविता कांबळे, जयश्रीची आई.लहानपणी उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद वाटतो. यात आईने घेतलेले कष्ट व दोन भाऊ तसेच पती अन् सासरच्यांनी दिलेली खंबीर साथ मोलाची आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारू शकले. यापुढे ‘खाकी’ला शोभेल असेच उल्लेखनीय कार्य करून दाखवणार आहे.
- जयश्री कांबळे, पोलीस उपनिरीक्षक.