जावळी तालुक्यातील तेटली, लामज, केळघर, कुसुंबी, शेंबडी, पाटण तालुक्यातील सळवे, निवी, पाणेरी, नानेल, गावडेवाडी, कारवट, काठी, मराठवाडी तसेच महाबळेश्वर तालुक्यातील लाखवड येथे मोबाईल कनेक्टिव्हिटीची अडचण आहे. त्यामुळे या गावात नवीन मोबाईल टॉवर लावण्याची मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे. असे सांगून याठिकाणी मोबाइल टॉवर उभारावेत अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी यावेळी केली.
कराड : सातारा जिल्ह्यात विस्कळीत झालेल्या बीएसएनएल नेटवर्कमध्ये सुधारणा करून नागरिकांना चांगली सेवा पुरवावी अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली.
लोकसभेत लोकहिताचे तातडीच्या मुद्दावरील चर्चेत सहभागी होऊन खा.पाटील यांनी ही मागणी केली. ते म्हणाले, सातारा जिल्हा हा डोंगररांगामध्ये विखुरला गेला आहे. आजच्या इंटरनेट युगात येथील बीएसएनएलचे नेटवर्क अत्यंत खराब आहे. दुर्गम आणि डोंगरी भागात बीएसएनएलची सेवा अद्याप मिळत नाही. त्यामुळे आवश्यक बनलेल्या मोबाईल सेवेअभावी तेथील वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. आज मोबाईल ही प्रमुख गरज बनत चालली आहे. एकमेकांशी बोलण्याचे साधन म्हणून उपयोग करतानाच जगाच्या संपर्कात राहण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. याशिवाय सोशल मीडियाच्या वापरासाठी इंटरनेटचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे मोबाइल आणि इंटरनेट सेवा मिळणे गरजेचे बनले आहे. सातारा जिल्ह्याच्या डोंगरी भागातील बीएसएनएलची सेवा पूर्णपणे प्रभावित असून ती विस्कळीत झालेली आहे. सध्याच्या ऑनलाईन युगात ग्रामीण भागातील युवावर्ग इंटरनेटशी जोडला जात आहे. मोबाईल बॅंकिंग, ऑनलाईन शिक्षण, वर्क ॲट होम यासाठी इंटरनेट आवश्यक आहे. मात्र दुर्गम आणि डोंगरी भागात बीएसएनएल सेवा मिळत नसल्याने नेटवर्कसाठी नागरिकांना डोंगर पठारावरील उंच जागेवर जावे लागत आहे. अनेक माथाडी कामगारांना मुंबई सारख्या मोठ्या शहरात कामासाठी जावे लागते. त्यांना गावी असलेल्या आपल्या नातेवाईकांशी नियमित संपर्क ठेवावा लागतो. मात्र रेंज अभावी सेवा त्यांना मिळत नाही. बीएसएनएल ही शासकीय सेवा देणारी मोठी कंपनी असून देखील जर ग्राहक खाजगी कंपनीच्या मोबाईल सेवेकडे वळत असेल तर ही निंदनीय बाब आहे. नागरिकांना बीएसएनएलची सुविधा न मिळणे हे योग्य नाही. याबाबत केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लक्ष घालून सातारा जिल्ह्यात विस्कळीत झालेली बीएसएनएल सेवा सुरळीत सूरू करावी अशी मागणी त्यांनी केली.