कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्स दक्षिण विभागात सर्वोत्कृष्ट
News By : कराड | संदीप चेणगे
पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सन २०२०-२१ या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दक्षिण विभागात सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यास, तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांमुळे कृष्णा कारखान्याचे चेअरमन तथा जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या नियोजनबद्ध, पारदर्शक व प्रगतिशील कारभारावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या यशाबद्दल कृष्णा कारखान्याचे व जयवंत शुगर्सचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. साखर क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेद्वारे पुरस्कार जाहीर केले जातात. यंदाच्या पुरस्कारांची घोषणा संस्थेतर्फे नुकतीच करण्यात आली. गेली ६ वर्षे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखाना उत्कृष्ट वाटचाल करत आहे. सन २०२०-२१ या गळीत हंगामात कारखान्याने १०० टक्क्यांहून अधिक गाळप क्षमतेचा वापर म्हणजे १०१.०५ टक्के गाळप क्षमतेचा वापर करत, १२.७५ टक्के इतका साखर उतारा घेतला आहे. नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे कारखान्याच्या गाळप क्षमतेत १.७८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिवाय मागील २ वर्षांच्या तुलनेत साखर उताऱ्यामध्ये ०.१० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच रिड्यूस्ड ओव्हरऑल रिकव्हरी ८७.६९ टक्के, तर रिड्यूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन ९५.६७ टक्के राहिले आहे. विशेष म्हणजे कृष्णा कारखान्याने साखर तयार करण्यासाठी फक्त १५.४१ टक्के इतकाच बगॅसचा वापर केला आहे. तसेच जयवंत शुगर्सनेही सन २०२०-२१ या गळीत हंगामात १०० टक्क्यांहून अधिक गाळप क्षमतेचा वापर म्हणजे १०२.७७ टक्के गाळप क्षमतेचा वापर करत, १२.५७ टक्के इतका साखर उतारा घेतला आहे. तसेच रिड्यूस्ड ओव्हरऑल रिकव्हरी ८६.७८ टक्के, तर रिड्यूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन ९६.५३ टक्के राहिले आहे. विशेष म्हणजे जयवंत शुगर्सने साखर तयार करण्यासाठी फक्त १८.०१ टक्के इतकाच बगॅसचा वापर केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत व्ही.एस.आय.ने सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कृष्णा कारखान्यास; तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जयवंत शुगर्सला जाहीर केला आहे. मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, लवकरच या पुरस्कारांचे वितरण पुणे येथे केले जाणार आहे. या यशाबद्दल कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, शेतकरी सभासद, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.