वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुरकवडी येथे दि.13 डिसेंबर रोजी वाळू उपसा करणार्या गाड्या पकडल्याने तलाठी व वाळूवाले यांच्यात धराधरी झाली होती. याबाबत यंत्रणा जागी झाल्यानंतर मात्र, एका पोलिसाने संशयितांना कारवाईची भीती दाखवत तीस हजारांचा मलिदा हाणत ‘अनमोल’ कामगिरी केल्याची चर्चा वडूज परिसरात सुरू आहे. आता यावर वरिष्ठ नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .
वडूज : वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुरकवडी येथे दि.13 डिसेंबर रोजी वाळू उपसा करणार्या गाड्या पकडल्याने तलाठी व वाळूवाले यांच्यात धराधरी झाली होती. याबाबत यंत्रणा जागी झाल्यानंतर मात्र, एका पोलिसाने संशयितांना कारवाईची भीती दाखवत तीस हजारांचा मलिदा हाणत ‘अनमोल’ कामगिरी केल्याची चर्चा वडूज परिसरात सुरू आहे. आता यावर वरिष्ठ नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .
याबाबत माहिती अशी की, भुरकवडी येथील एका ओढ्यात लपूनछपून वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याची माहिती खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी एक पथक तयार करून गस्त घालण्याचे आदेश तलाठी व सर्कल यांना दिले होते. हे पथक दि. 13 रोजी भुरकवडी परिसरात गस्त घालत असताना एक जेसीबी व दोन ट्रॅक्टर वाळू उपसा करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर वाळू उपसा करणार्या संशयितांना तलाठी व सर्कल यांनी हटकून सर्व वाहने कारवाईसाठी वडूज पोलीस ठाण्यात घेण्याचे फर्मान दिले. मात्र, कारवाईच्या भीतीने बिथरलेल्या वाळू व्यावसायिकाने अण्णासाहेबांच्या गचांडीला हात घालत त्यांच्यावरच दगड-धोंडे उगारल्याची घटना घडली. या घटनेनंतर महसूल व पोलीस विभागाने तोंडात मिठाची गुळणी घेत काही घडलेच नसल्याचा बडेजाव केला होता.
मात्र, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार एका दैनिकाने दि. 15 रोजी यावर भाष्य करणारे परखड वृत्तांकन केले. त्यानंतर कारवाईबाबत हालचाली सुरू झाल्या. परंतु, ज्या तलाठ्याच्या गचांडीला वाळू व्यावसायिकाने हात घातला त्याच तलाठ्याने भीती वाटत असल्याचे कारण पुढे करत तक्रार देण्यास नकार दिला होता. अण्णासाहेब तक्रार देत नसल्याचे कळाल्यानंतर या संधीचा फायदा घेत, वडूज येथील एका पोलीस दादांनी वाळू व्यावसायिकाला कारवाईची भीती दाखवून त्याच्याकडून तीस हजार रुपयांचा मलिदा उकळल्याची चर्चा वडूज परिसरात सुरू आहे.
एका बाजूला वरिष्ठ अधिकारी प्रामाणिकपणे काम करून अवैध धंद्यांना आवर घालत आहेत तर दुसरीकडे असे काही कर्मचारी ‘अनमोल’ कामगिरी करून अवैध धंद्यांना खतपाणी घालत असल्याचे बोलले जात आहे. वर्षांनुवर्ष याच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या अशा कर्मचार्यांमुळे अनेकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे डीवायएसपी डॉ. नीलेश देशमुख अवैध व्यावसायिकांसह त्यांच्याशी लागेबांधे असलेल्या कर्मचार्यांना धडा शिकवणार की पाठीशी घालणार याकडे पोलीस दलासह तालुक्याच्या नजरा लागून आहेत.
पालकमंत्र्यांकडे त्या दोघांच्या तक्रारी
वडूज येथील अनमोल व बापू म्हणून परिचित असलेल्या त्या दोघांच्या भानगडींना वैतागलेल्या लोकांच्या भावना लक्षात घेत, तालुक्यातील एका नेत्याने थेट पालकमंत्र्यांकडेच कैफियत मांडली होती. तरीही त्यांच्यावर कारवाई न झाल्याने आपले काहीच होत नसल्याच्या आविर्भावात ते दोघे वावरत आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल काय कारवाई करणार, हे पाहणे औत्सुक्याचे राहील.
तथ्य आढळ्यास संबंधितावर कारवाई करू
वडूज, म्हसवड, दहिवडी, औंध पोलीस ठाण्यात असलेली सगळी टीम उत्तम काम करत आहे. परंतु, कोणी एखादा कर्मचारी असे वर्तन करून पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणार असेल तर ते गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची माहिती घेत, तथ्य आढळल्यास कडक कारवाई केली जाईल.
- डॉ. नीलेश देशमुख, डीवायएसपी.