‘खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोठी बाजारपेठ असल्याने पुसेगावात विकास कामांना गती देण्यासाठी निधी कमी पडू देणार आहे,’अशी ग्वाही आ. महेश शिंदे यांनी दिली.
निढळ : ‘खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोठी बाजारपेठ असल्याने पुसेगावात विकास कामांना गती देण्यासाठी निधी कमी पडू देणार आहे,’अशी ग्वाही आ. महेश शिंदे यांनी दिली.
पुसेगाव (ता. खटाव) येथील नागरिकांसाठी अत्यंत अडचणीच्या असलेल्या दोन अंतर्गत रस्त्यांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे विद्यमान विश्वस्त व जनशक्ती संघटनेचे प्रमुख रणधीर जाधव, माजी चेअरमन सुनीलशेठ जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, विसापूरचे हरी सावंत, नेरचे सरपंच सुरेश चव्हाण, प्रा. टी. एन. जाधव, प्रा. ए. डी. जाधव, प्रा. केशव जाधव, अंकुश पाटील, सूरज जाधव, रोहन देशमुख, सुसेन जाधव, मोहन जाधव, बाबू जाधव, दिलीप देशमुख, पी. डी. जाधव, विनायक जाधव, नंदकुमार जोशी, राम जाधव, जीवन जाधव, श्रीकांत पवार, डॉ. महेश भिसे, दिलीप उनउने, घनश्याम मसणे, दीपक तोडकर, अमर खटावकर, सुशील जाधव, संदीप कट्टे, कुमार जाधव, विजय सावंत, गोट्या जाधव, अविनाश जाधव, नीलेश जाधव, ओंकार जाधव, चेतन जाधव यांच्यासह जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पुसेगावातील जिल्हा मध्यवर्ती बँक, पोस्ट ऑफिस, सोसायटी तसेच वीज वितरण कंपनीचे कार्यालय एकाच ठिकाणी असल्याने नेहमी ग्राहकांच्या वर्दळीने बाचल गिरणीच्या पुढील रस्ता ये-जा करणार्या नागरिकांसाठी अडचणीचा ठरला होता. गत सहा वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, रस्त्यालगत असलेल्या गटारांच्या उंची पेक्षा रस्ता सुमारे दोन ते तीन फूट उंच असल्याने कित्येकदा या ठिकाणी अपघात घडले होते. येथे रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या दुचाकीमुळे कुठल्याही वाहनांना तसेच शेतकर्यांच्या बैलगाड्यांना व नागरिकांना पायी जाताना मोठी कसरत करावी लागत होती.
त्यामुळे श्री सेवागिरी जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून मागील ग्रामपंचायतीच्या काळात जनसुविधा योजनेंतर्गत सुमारे तीनशे मीटर लांबीचा जिल्हा बँक ते लेंढोरी ओढा व नागरी सुविधा योजनेंंतर्गत लेंढोरी ओढा ते तोडकर वस्ती नजीकचा रस्ता पूर्णतः रुंदीकरण व डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. सातत्याने पाठपुरावा करून मागील ग्रामपंचायतीने हा रस्ता मंजूर करून आज कामही सुरू केले. त्यामुळे नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
पुसेगावच्या उत्तरेला नव्याने झालेल्या वसाहतीतील नागरिकांसाठी हाच रस्ता असल्याने या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते. परंतु, या रस्त्यावरील लेंढोरी ओढ्यावर असलेल्या पुलाला मध्यभागी मोठे भगदाड पडल्याने या पुलाची दुरुस्ती न होता नवीन पूल व्हावा, अशी मागणी रणधीर जाधव यांनी करताच आ. महेश शिंदे यांनी या पुलाच्या नवीन बांधकामासाठी निधीची तरतूद करण्याची तसेच नाबार्डचे ही सहकार्य या पुलाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.