सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने २२ कोटींचा जीएसटी कर भरला आहे. याशिवाय व्हॅट म्हणजेच मूल्यवर्धित करापोटी सुमारे ९० कोटींचा भरणा शासनाकडे केला आहे. त्यामुळे जीएसटी आणि व्हॅट कर भरण्यात कृष्णा कारखाना आघाडीवर राहिला असून, सर्वाधिक व्हॅट कर भरणारा कारखाना म्हणूनही कृष्णा कारखान्याचा लवकरच सन्मान केला जाणार आहे.
सातारा जिल्ह्यात सर्वाधिक जीएसटी कर भरण्यात रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना आघाडीवर आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने जीएसटी करापोटी २२ कोटी रूपयांचा भरणा करत, शासनाच्या तिजोरीत मोठी भर घातली आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटी कर प्रणालीच्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, शासनास सर्वाधिक जीएसटी कर उपलब्ध करून दिल्याबद्दल वस्तू व सेवाकर विभागाने कारखान्याचा विशेष गौरव केला आहे.
शासनाची तिजोरी मजबूत करण्यामध्ये करांचा वाटा मोठा असतो. विविध संस्थांच्या आणि व्यवसायांच्या माध्यमातून शासनाकडे दरवर्षी मोठी रक्कम कररूपाने गोळा होत असते. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या २ आर्थिक वर्षात सर्वच संस्थांना मोठ्या आर्थिक अडचणीतून वाटचाल करावी लागली. मात्र अशा परिस्थितीतही कृष्णा कारखान्याने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करत, सहकार व उद्योग क्षेत्रात स्वत:ची छाप पाडली आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने शासनाकडे जीएसटी करापोटी २२ कोटी रूपयांचा भरणा केला आहे.
शासकीय महसूलामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल वस्तू व सेवाकर विभागाच्या उपायुक्त श्रीमती टी. डी. मोरे यांच्या हस्ते कृष्णा कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात करण्यात आले. यावेळी राज्य कर उपायुक्त ठाणेकर मॅडम, सोरटे साहेब, कारखान्याचे फायनान्स मॅनेजर जयेंद्र नाईक, टॅक्स अकौटंट विठ्ठल साळुंखे यांच्यासह वस्तू व सेवाकर विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.