भूलतज्ज्ञ संघटनेची देशव्यापी मशाल यात्रा बुधवारी कराडमध्ये येणार
News By : कराड | संदीप चेणगे
कराड : देशपातळीवर कार्यरत असलेल्या ‘इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेलॉजिस्ट’ या भूलतज्ज्ञांच्या संघटनेच्या स्थापनेचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी काढण्यात आलेल्या देशव्यापी मशाल यात्रेचे आगमन बुधवारी (ता. ५) कराडमध्ये होणार आहे, अशी माहिती भूलतज्ज्ञ संघटनेच्या कराड शाखेचे अध्यक्ष डॉ. रमाकांत मोहिते व सचिव डॉ. श्रद्धा बहुलेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. वैद्यकीय क्षेत्रात भूलतज्ज्ञांचे असलेले महत्व अधोरेखित व्हावे, तसेच उत्तम आरोग्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी ‘इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेलॉजिस्ट’ या भूलतज्ज्ञांच्या संघटनेच्यावतीने २ ऑक्टोबरपासून देशाच्या विविध भागातून देशव्यापी मशाल यात्रेचा प्रारंभ करण्यात आला आहे. देशभरातून निघालेल्या या मशाल यात्रा २६२ शहरांतून प्रवास करणार असून, १६ ऑक्टोबरला दिल्ली येथे या यात्रेतून आलेल्या देशभरातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत जागतिक भूलशास्त्र दिन साजरा केला जाणार आहे. कराड येथील प्रीतिसंगम घाटावर बुधवारी (ता. ५) सायंकाळी ५.३० वाजता या मशाल यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी 'प्रत्येक नागरिक एक जीवन रक्षक' या उपक्रमाअंतर्गत अचानक हृदयक्रिया बंद पडल्यास वैद्यकीय मदत उपलब्ध होईपर्यंत करावयाची ‘जीवनसंजीवनी क्रिया’ याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक यावेळी दिले जाणार आहे. तसेच पथनाट्याचेही सादरीकरण केले जाणार आहे. याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेलॉजिस्ट’च्या कराड शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.