सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात 24 तासात 4 टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वर येथे जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून काही ठिकाणचे जनजीवन ठप्प झाले आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 161 मिलीमीटर, नवजा येथे 204 मिलीमटर तर महाबळेश्वर येथे 246 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चोवीस तासात कोयना धरणात 3.76 टीएमसी पाण्याची आवक झाली असून धरणाचा पाणीसाठा 35.09 टीएमसी झाला आहे. यापैकी उपयुक्त पाणीसाठा 29.96 टीएमसी आहे. धरणाची क्षमता 105 टीएमसी असून यापैकी 33.34 टक्के धरण भरले आहे. धरणामध्ये गेल्या 24 तासात 43557 क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. याचबरोबर जिल्ह्यातील सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कराडनजीकचा खोडशी बंधार्यांवरून कृष्णा नदीचे पाणी वाहू लागले आहे.