‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अथक जीवन कार्य म्हणजे असामान्य कर्तृत्वाचा दीपस्तंभ आहे. त्यांच्या विचार कार्याने मानवी जगण्याला नवी उमेद आणि सामर्थ्य प्राप्त होते आहे,’ असे मत आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासिका डॉ. दीपा श्रावस्ती यांनी व्यक्त केले.
मायणी : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अथक जीवन कार्य म्हणजे असामान्य कर्तृत्वाचा दीपस्तंभ आहे. त्यांच्या विचार कार्याने मानवी जगण्याला नवी उमेद आणि सामर्थ्य प्राप्त होते आहे,’ असे मत आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासिका डॉ. दीपा श्रावस्ती यांनी व्यक्त केले.
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त प्रज्ञासूर्य ग्रंथालय मायणीद्वारा आयोजित ऑनलाइन भीमगीत गायन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. श्यामसुंदर मिरजकर म्हणाले, ‘विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचार हे प्रत्येक समस्येची उकल करण्यासाठी उपयुक्त असून त्यांच्या विश्वव्यापी विचारांचे वाचन व मनन झाले पाहिजे. प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणजे गायन असून या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचलेले आहेत.‘
या भीमगीत गायनानिमित्त उमेश गायकवाड वाई, शुभांगी तिरमारे सांगली, कवी किरण अहिवळे, प्रज्ञा खरात, गोपीचंद खरात फलटण, मृण्मयी कांबळे मायणी, आम्रपाली मस्के सोलापूर, कोमल जावीर सांगली, दिव्यांका दुताडे आदींनी भीमगीत गायन करून आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमास विनोद कांबळे, प्रमोद देवकुळे, प्रदीप भांदिर्गे, सुभाष सलगर, मृगेंद्र शिंदे, रमेश पोळ, रूपाली गुरव आदी उपस्थित होते.
दरम्यान, मायणी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सचिन गुदगे, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ भिसे, नितीन झोडगे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भीमराजा प्रतिष्ठानच्या वतीने अंकुश निकाळजे, अमर झोडगे, किरण झोडगे, डॉ.रामचंद्र कांबळे यांनी बुद्ध वंदना घेऊन अभिवादन केले.
संयोजक बाळासाहेब कांबळे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कुंदा लोखंडे कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. किरण अहिवळे यांनी आभार मानले.