नांदेडहून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा ईमेल
कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद ः संशयितास ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना
Published:Jul 30, 2023 04:33 PM | Updated:Jul 30, 2023 04:33 PM
News By : Muktagiri Web Team
कराड ः कराड दक्षिणचे विद्यमान आमदार व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ईमेलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत ई-मेल करणार्याचा शोध घेतला असून त्याला ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे. तर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अक्षय चोराडे (नांदेड) असे धमकीच्या मेलप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमरावती येथे संभाजी भिडे यांनी एका कार्यक्रमात महात्मा गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्य वक्तव्य केल्यानंतर विधानसभेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. चव्हाण यांच्या मागणी प्रमाणे आणि ही विरोधकांनी ही मागणी लावून धरली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधिताचे वक्तव्य तपासून कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते. दरम्यान आज कराड येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना ई-मेल करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चव्हाण यांच्याकडून कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत आयपी ऍड्रेस शोधून काढला आहे. त्या ई-मेल करणार्यास ताब्यात घेण्यासाठी एक पथक ही रवाना करण्यात आले आहे.