विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अंगातील सुप्त गुणांना ओळखून त्यांना वाव दिला पाहिजे. शिक्षणा बरोबरच खेळालाही महत्त्व देऊन आपणास प्रगती करता येते. केवळ खेळात प्रावीण्य मिळवून ही थेट प्रशासकीय सेवेत काम करण्यास संधी मिळते,’ असे उद्गार पुणे प्रादेशिक उपविभागाचे वाहन निरीक्षक संभाजी गावडे यांनी काढले.
फलटण : ‘विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अंगातील सुप्त गुणांना ओळखून त्यांना वाव दिला पाहिजे. शिक्षणा बरोबरच खेळालाही महत्त्व देऊन आपणास प्रगती करता येते. केवळ खेळात प्रावीण्य मिळवून ही थेट प्रशासकीय सेवेत काम करण्यास संधी मिळते,’ असे उद्गार पुणे प्रादेशिक उपविभागाचे वाहन निरीक्षक संभाजी गावडे यांनी काढले.
गुणवरे (ता. फलटण) येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता तिसरीत शिकणार्या श्रीराम लहु आडके याने नुकतेच सायकलिंगमध्ये केलेल्या कामगिरीस प्रोत्साहन म्हणून शाळेमार्फत विद्यार्थ्यास पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी आवश्यक अँड्रॉइड मोबाईल टॅब देऊन आयोजित केलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावडे, साधनाताई गावडे, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदणी सेंटरचे अजित कर्णे, शाळेतील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेचे प्राचार्य संदीप किसवे यांनी व्यक्त केलेल्या मनोगतामध्ये शाळेने विद्यार्थ्यांना सर्वांगीणदृष्ट्या घडवण्यासाठी अभ्यासाबरोबरच शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी प्रतिवर्षी क्रीडा स्पर्धाचेही आयोजन केले जाते. परंतु, लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असताना या विद्यार्थ्याने स्वतः सायकलिंगचा सराव करून जी कामगिरी केली आहे, ती इतरांना खरंच प्रोत्साहित करते. अभ्यासाबरोबर खेळालाही महत्त्व दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
तसेच कर्णे यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्याकडून होणार्या अशा प्रकारचे रेकॉर्डचे संकलन करून ते नोंद केले जाईल, असे सांगितले व शाळेमध्ये वर्ल्ड रेकॉर्डस् नोंदणी केंद्र सुरू करणार असल्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी त्याचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे गिरीधर गावडे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश सस्ते यांनी आभार मानले.