कृष्णा बँकेला देशपातळीवरील ‘बँको २०२२’ पुरस्कार प्रदान
News By : Muktagiri Web Team
कराड : कृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या कृष्णा सहकारी बँकेला महाबळेश्वर येथे नुकत्याच झालेल्या बँकींग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या परिषदेत देशपातळीवरील ‘बँको २०२२’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते कृष्णा बँकेच्या संचालकांनी व पदाधिकार्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सहकार क्षेत्राला बळकटी आणणार्या सहकारी बँकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अविज् पब्लिकेशनच्या विद्यमाने दरवर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्या बँकांना बँको पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा या संस्थेने संपूर्ण भारतातील ४०० ते ५०० कोटी रूपयांपर्यंतच्या ठेवी असणार्या नागरी सहकारी बँकांची पाहणी करून, या विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविणारी बँक म्हणून कृष्णा सहकारी बँकेची निवड या पुरस्कारासाठी केली. कृष्णा बँकेने चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने मोठा विस्तार केला असून, सामान्य माणसांसाठी कार्य आणि सभासद हिताचा कारभार या उद्दिष्टाने बँकेने वाटचाल सुरु ठेवली आहे. महाबळेश्वर येथे आयोजित बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या परिषदेत बँकेचे व्हाईस चेअरमन दामाजी मोरे, संचालक शिवाजीराव थोरात, प्रमोद मारुती पाटील, रणजीत लाड, हर्षवर्धन मोहिते, नामदेव कदम, प्रदीप थोरात, विजय जगताप, प्रकाश पाटील, गिरीश शहा, शिवाजी पाटील, संतोष पाटील, अनिल बनसोडे, नारायण शिंगाडे, ॲड. विजय पाटील, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर, सदस्य गुणवंत जाधव, हणमंतराव पाटील, प्रमोद गुणवंतराव पाटील, सुनील पाटील, प्रदीप पाटील, माजी संचालक महादेव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे, मुख्य व्यवस्थापक भगवान जाधव यांनी हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. या पुरस्काराबद्दल बँकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.