पुळकोटी (ता. माण) येथील सुलभा मारूती गलंडे व मारूती बिरा गलंडे यांना पुण्यातील सुसंगत फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय ‘आदर्श माता-पिता’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
वडूज : पुळकोटी (ता. माण) येथील सुलभा मारूती गलंडे व मारूती बिरा गलंडे यांना पुण्यातील सुसंगत फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय ‘आदर्श माता-पिता’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
येथील स्पंदन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे मालक डॉ. संदेश गलंडे व अमेरिकन कंपनीतील सॉफ्टवेअर इंजिनिअर मनिष गलंडे यांचे ते आई वडील आहेत.
पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात हा पुरस्कार सोहळा नुकताच झाला. माजी जिल्हाधिकारी, साहित्यिक डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते व ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक ज्योतिराम कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
यावेळी राजेश बागुल व इतर मान्यवर उपस्थित होते.
मारूती गलंडे यांनी जुन्या अकरावीमध्ये देवापूर केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर ते रयत शिक्षण संस्थेत लिपीक म्हणून सेवानिवृत्त झाले. तर आई सुलभा यांचे जुनी सातवी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. गलंडे दांपत्यांने मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवित आदर्श माता पित्याची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सुसंगत फाऊंडेशनच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय ‘आदर्श माता-पिता’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
डॉ. सुधाकर न्हाळदे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. संगीता न्हाळदे यांनी आभार मानले.
गलंडे यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.