गुरसाळे (ता. खटाव) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत असूनसुद्धा कोविड सेंटर सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
वडूज : गुरसाळे (ता. खटाव) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत असूनसुद्धा कोविड सेंटर सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गुरसाळे येथे शासनाचा आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेने लाखो रुपयांचा निधी खर्चुन भव्य इमारत बांधली आहे. या इमारतीत सुमारे 100 बेडचे सुसज्ज कोविड सेंटर होऊ शकते. त्याचा फायदा गुरसाळे बरोबर अंबवडे, निमसोड, गोपूज, शिरसवडी, उंबर्डे, वाकळवाडी, नढवळ आदी गावांतील रुग्णांना होऊ शकतो. थ्री फेज लाईट कनेक्शन नसल्यामुळे रुग्णालयाचे कामकाज चालू होऊ शकले नाही. वेळेत कोविट सेंटर न सुरू झाल्याने गावातील दोन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तर अनेक रुग्ण व नातेवाइकांना उपचारासाठी धावाधाव करावी लागत आहे. मागील आठवड्यात खटाव तालुक्यातील पडळ व गुरसाळे येथील कोविड सेंटर सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यापैकी पडळचे कोविड सेंटर सुरू झाले, मात्र गुरसाळे सेंटर सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाकडून चालढकल होत आहे.
आत्तापर्यंत प्रांताधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी, तसेच कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख व अन्य पदाधिकार्यांनी गुरसाळे गावात भेट देऊन इमारतीची पाहणी केली. मात्र, प्रत्यक्षात अद्याप कामकाज सुरू झाले नाही. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनाही अडीअडचणी संदर्भात निवेदन दिले आहे.
येत्या दोन दिवसांत कार्यवाही नाही झाली तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील, असा इशारा गावचे उपसरपंच व सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष अॅड. रोहन जाधव, सरपंच हासनभाई शिकलगार व प्रमुख कार्यकर्त्यांनी दिला आहे.
बेडची अडचण : डॉ. शेख
याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, इमारत व अन्य तांत्रिक अडचणींवर मार्ग निघाला आहे. मात्र, अद्याप बेड उपलब्ध झाले नाहीत. निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याशी संलग्न सामाजिक संस्थांच्या माध्यमातून 30 बेड मिळणार आहेत. या व्यतिरिक्त जिल्हा परिषद व समाजातील दानशूर व्यक्तींकडून आणखी काही बेड उपलब्ध झाल्यास तातडीने गुरसाळे कोविड सेंटर सुरू करता येईल.