पालिकेने खोदलेल्या खड्ड्यात पडून बालकाचा मृत्यू
कराड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील घटना
Published:4 y 1 m 1 d 14 hrs 28 min 2 sec ago | Updated:4 y 1 m 1 d 14 hrs 13 min 51 sec ago
News By : कराड | संदीप चेणगे
कराड : येथील आंबेडकर चौकातील नगरपालिका शाळा क्रमांक दहाच्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सायंकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आले आहे. विराट विजय चव्हाण (वय 5 रा. बुधवार पेठ, कराड) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये विराट चव्हाण हे बालक सायंकाळी सात वाजेपर्यंत घरांनजीक खेळत होते. मात्र सातनंतर ते अचानक पणे कोठे गेले हे कोणाला समजले नाही. त्याच्या नातेवाईकांनी सुमारे दीड ते दोन तास परिसरात शोध घेतला मात्र तो सापडला नाही. यानंतर शाळा क्रमांक दहा नजीक संरक्षक भिंतीच्या ठिकाणी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये शोध घेतला असता खड्ड्यातील पाण्यामध्ये बुडालेल्या स्थितीत त्याचा मृतदेह रात्री दहाच्या सुमारास आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.