कराड : शैक्षणिक पंढरीत दहा हजार विद्यार्थ्यांची महारॅली
News By : कराड | संदीप चेणगे
पुण्यानंतर विद्येचे दुसरे माहेरघर असणाऱ्या कराडच्या शिक्षण मंडळ या संस्थेला व टिळक हायस्कूलला शंभर वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने आयोजित शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ आज महाप्रभात फेरीच्या आयोजनाने करण्यात आला. या रॅलीत सुमारे विविध शाखांमधील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिक्षणाच्या पंढरीत शिक्षण संस्थेने काढलेल्या या महारॅलीने इतिहास रचल्याचे दिसून आले. रॅलीत सोळा आकर्षक चित्ररथ सामील झाले होते. हातात शिक्षणाचे महत्व सांगणारे फलक रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेल्या दहा हजार विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. ०१ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले. या निमित्ताने कराडमध्ये देशभक्त नागरिकांच्या पुढाकाराने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलची स्थापना करण्यात आली. संस्थेला व टिळक हायस्कूलला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या समारंभाची सुरुवात महाप्रभात विद्यार्थी रॅली व चित्ररथ रॅलीने करण्यात आली. रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी शिक्षण मंडळ कराडचे अध्यक्ष डॉ.अनिल हुद्देदार चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी व्हाईस चेअरमन श्रीमती अनघा परांडकर सचिव चंद्रशेखर देशपांडे सहसचिव राजेंद्र लाटकर आणि संस्थेचे सर्व कौन्सिल सदस्य सर्व संचालक मंडळ, शताब्दी महोत्सव माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष अॅड सदानंद चिंगळे टिळक हायस्कूल चे मुख्याध्यापक जी.जी.अहिरे टिळक हायस्कूल माजी विद्यार्थी सेवा संघाचे अध्यक्ष डॉ.मिलिंद पेंढारकर तसेच विविध क्षेत्रातील माजी नामवंत विद्यार्थी, हजारो आजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. महाप्रभात रॅलीच्या अग्रभागी सजवलेल्या पालखीत लोकमान्य टिळकांची प्रतिमा व गीतारहस्य ग्रंथ ठेवण्यात आला होता. या महाप्रभात रॅलीत टिळक हायस्कूलचे झांज पथक तसेच विविध वेशभूषा केलेले विद्यर्थी, लाहोटी कन्या प्रशालेचे बँड पथक, तसेच शिक्षण मंडळाचे पदाधिकारी नामवंत माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. या चित्ररथ रॅलीमध्ये टिळक हायस्कूलचा लोकमान्य टिळकांवरील महाभियोग चित्ररथ, त्यानंतर पूर्व प्राथमिक शाळा कराड, पूर्व प्राथ ओगलेवाडी, स्मार्टकिड्स प्री स्कूल व CBSE, एस.एम.एस.इंग्लिश मिडीयम पूर्व प्राथ सरस्वती पूजन, नूतन मराठी शाळा,बाल विद्यालय ओगलेवाडी,एस.एम.एस.प्राथमिक सरस्वती पूजन,टिळक हायस्कूलचा टिळकांवरील महाभियोग प्रसंगचित्ररथ, व सजवलेल्या पालखीत गीतारहस्य ग्रंथ, लाहोटी कन्या शाळेचा मोरावरची सरस्वती, आत्माराम विद्यामंदिर ओगलेवाडी, एस एम एस इंग्लिश मिडीयम शाळा माध्यमिक, टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी, महिला महाविद्यालयाचा महिला सबलीकरण व इतर सर्व शाखांच्या शैक्षणिक वैशिष्ठ्यांचे चित्ररथ तसेच महर्षी कणाद सायन्स अॅकॅडमी,खाशाबा जाधव स्पोर्ट्स अॅकॅडमी,संस्कृतिका विभाग, ज्योतिष महाविद्यालय,कृष्णाकाठ इन्स्टिट्यूट फॉर स्कील डेव्हलपमेंट,नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे वसतिगृह इत्यादिचे पदाधिकारी व कर्मचारी रॅलीत सहभागी झाले होते . या महाप्रभात रॅलीची टिळक हायस्कूलच्या प्रांगनात सुरुवात होऊन कृष्णा नाका, वेणूताई चव्हाण रुग्णालय,एस.टी स्टँड, दत्त चौक,पेठ लाईन मार्गे चावडी चौक, कन्या शाळा मार्गे टिळक हायस्कूलच्या मैदानावरती रॅलीची सांगता करण्यात झाली. सांगता समारंभ प्रसंगी टिळक हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनी प्रास्ताविक केले. शिक्षण मंडळाचे सचिव चंद्रशेखर देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. टिळक हायस्कूलचे शिक्षक भरत कदम यांनी सूत्रसंचालन केले. कन्या शाळेचे शिक्षक महिंद्र भोसले यांनी आभार मानले.