कराड येथील प्रीतीसंगमावर पोहण्यासाठी आलेल्या एकावर मगरीने हल्ला केला. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. या घटनेमुळे प्रतिसंगमावर मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मधुकर लक्ष्मण थोरात (रा. कराड, वय 50) असे मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा नदी पात्रात गेल्या महिन्याभरापासून टेंभू, खोडशी, वहागाव या परिसरामध्ये नदीकाठावर मगरींचे शेतकऱ्यांना दर्शन होत होते. गेल्या चार ते पाच दिवसात पावकेश्वर मंदिर परिसरातील मगरीचे दर्शन काही लोकांना झाले होते. यामुळे या परिसरामध्ये मगरीचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी पहाटे मधुकर थोरात कराडच्या प्रीतीसंगमावर पोहण्यासाठी गेले होते. पाण्यात उतरल्यानंतर प्रथम त्यांच्या बोटांना मगरीने पकडले, मात्र मधुकर थोरात यांनी हात झटकून पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. यावेळी मगरीने त्यांचा पाय पकडला मधुकर थोरात यांनी जोरात हिस्का मारून मगरीच्या तोंडातून आपला पाय सोडवून आरडाओरडा करत नदीपत्रातून बाहेर आले. यावेळी तेथे जमलेल्या लोकांनी थोरात यांना तातडीने उपचारासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे नदी काठावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.